नरेंद्र मोदींशिवाय देशात दुसरा नेताच नाही हा अहंभाव लोकसभा निवडणुकीत जनतेने संपवला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निकालानंतर दिली. माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही, मीच या देशाचा सर्वेसर्वा, देश विकला तरी चालेल अशी जी भावना होती तिला जनतेने संविधानाने दिलेल्या मताच्या तलवारीने सत्तेबाहेर काढले, असे ते म्हणाले.
नाना पटोले यांनी टिळक भवन येथे पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. लोकसभेतील विजयाचे श्रेय त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिले. मोदी सरकारविरोधात राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर, भारत जोडो यात्रा आणि मणिपूर ते मुंबई अशी न्याय यात्रा काढली आणि जनतेने जो प्रतिसाद राहुल गांधींच्या यात्रेला दिला हे त्याचे फलित आहे, असे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने, शाहू-फुलेंच्या महाराष्ट्राने चमत्कार केला. महाराष्ट्राच्या असंवैधानिक सरकारला धडा शिकवला. महाराष्ट्रामध्ये खोक्यांची व्यवस्था कधीही चालू शकत नाही, हे जनतेने दाखवून दिले, असे नाना पटोले म्हणाले.
आता मिंधेंच्या भ्रष्टाचाराचे सीरिज उघडणार
आता राज्यातील मिंधे सरकारच्या भ्रष्टाचाराचे सीरिज काँग्रेस उघडेल. त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे काँग्रेसकडे आहेत. शेतकऱयांच्या नावाने, रस्त्यांच्या नावाने केलेला भ्रष्टाचार, नद्यांमधील कचरा काढण्यात झालेला भ्रष्टाचार जनतेसमोर मांडू, असा इशाराही यावेळी नाना पटोले यांनी दिला. राज्याच्या तिजोरीसह महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या तिजोऱया कशा लुटल्या त्या जनतेसमोर आणू, असे ते म्हणाले.