
सामना प्रतिनिधी । नगर
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुधाकर आव्हाड यांची उमेदवारी जाहीर झाली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्रा. किसन चव्हाण व नगर दक्षिणचे निमंत्रक अॅड. अरुण जाधव यांनी दिली.
मुंबई येथे झालेल्या बैठकीत माजी खासदार तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली. सुधाकर आव्हाड हे मजले चिंचोली तालुका जिल्हा नगर येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांचे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मजले चिंचोली येथे झाले. तर आठवी ते अकरावी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण शिराळ चिंचोडी तालुका पाथर्डी येथे झाले. तर नगरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. पाणी व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात त्यांनी नेवासा व राहुरी तालुक्यात २५ वर्षे सेवा केली. २०१४ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेऊन ते पूर्ण वेळ समाजकारण व राजकारणात सहभागी झाले.
१९९५ पासून अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालिल भारिप बहुजन महासंघात ते सक्रिय सहभागी होते. त्यामुळे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी त्यांचा अनेक वर्षांपासून थेट संपर्क आहे. २०१४ मध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने राहुरी विधानसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढविली होती.
सुधाकर आव्हाड यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी नगर मधील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.






























































