भंडारा–गोंदियात ४०० हून अधिक केंद्रांवर मशीन बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नागपूर

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीतही ‘ईव्हीएम’चा राडा झाला. ३० ते ३५ मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन्स बंद पडल्यामुळे मतदारांना मतदानापासून काही काळापुरते वंचित राहावे लागले.

ही माहिती राजकीय पक्षांना मिळताच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रांवर धाव घेऊन आपला आक्षेप नोंदविला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी फेरमतदानाची मागणी केली आहे हे विशेष. जिह्यात सुमारे ४०० हून अधिक केंद्रांवर ईव्हीएम मशीन्स बंद पडल्यामुळे घोळ निर्माण झाला.

हे सरकारचे कारस्थान

हे निवडणूक आयोग आणि सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. या मतदारसंघात फेरमतदान घेण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली.

निवडणूक आयोगाने हात झटकले 

पालघर, भंडारा-गोंदिया आणि उत्तर प्रदेशात कैराना मतदारसंघात ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा झाला असतानाही निवडणूक आयोगाने मात्र जबाबदारीतून हात झटकले आहेत. उलट ‘ईव्हीएम’ मोठय़ा प्रमाणावर खराब झाल्याचे वृत्त अतिरंजित असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने निवेदन प्रसिद्धीस देऊन खुलासा करण्याचा प्रयत्न करताना ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपीएटी’ मशीन्समधील मोठय़ा प्रमाणावर झालेल्या गोंधळाची जबाबदारी घेतली नाही. भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत २५ टक्के मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन्समध्ये छेडछाड झाल्याचे वृत्त आयोगाने फेटाळले.

पोटनिवडणुकीसाठी आयोगाकडे पुरेशा राखीव ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपीएटी’ मशीन्स आहेत. काही बिघाड झाल्यास अवघ्या ३० मिनिटांत मशीन बदलली जाते असा दावा आयोगाने केला आहे.

ईव्हीएम मशीन्स गुजरातमधूनच का आणल्या? नीला सत्यनारायणन यांचा सवाल

गुजरातच्या सुरतमधील खासगी कंपनीकडून ईव्हीएम मशीन्स आणल्या गेल्या. तिथूनच ईव्हीएम मशीन्स आणण्यामागचे नेमके कारण काय, असा सवाल राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी केला आहे. एवढी वर्षे ‘भेल’ किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनच ईव्हीएम मशीन्स मागवल्या जात होत्या. मग यंदाच्याच निवडणुकांमध्ये सुरतच्या कंपनीकडूनच मशीन्स का मागवल्या गेल्या असे सत्यनारायणन यांनी एका टीव्ही वाहिनीवरील कार्यक्रमात विचारले.

मशीन्स बाहेरून आणल्याच कशाला?

‘महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पुरेशी असताना ती सुरतहून का मागवण्यात आली’ असा सवाल करतानाच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जिथे जिथे ईव्हीएममध्ये घोळ झाला आहे तिथे फेरमतदान घ्यावे आणि तोपर्यंत देशातील सर्व पोटनिवडणुकांचा निकाल थांबविण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केली. a

फेरमतदान घ्या!

 यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने तासन्तास रांगेत उभे राहूनही मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. मतदान यंत्रांत बिघाड झाला त्या सर्व मतदान केंद्रांवर फेरमतदान घ्यावे आणि व्हीव्हीपॅट स्लीपचीही मोजणी करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.