
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी रविवारी मतदान होत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशसह आठ राज्यांतील 59 जागांसाठी मतदान होत असून पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी लोकसभेचा यामध्ये समावेश आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर या प्रमुख उमेदवारांच्या भवितव्याचा फैसलाही या टप्प्यामध्ये होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यामधील 59 जागांपैकी 2014 मध्ये भाजपने 30 जागा जिंकल्या होत्या. त्या जागा राखण्यासाठी भाजपपुढे आव्हान आहे, तर तृणमूल काँग्रेस, अकाली दल आणि आप यांनासुद्धा यांच्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा असून सर्वच राजकीय पक्षांसाठी हा टप्पा म्हणजे लोकसभेचा शेवटचा पेपर आहे.
पंजाबमधील सर्व 13 जागांसाठी लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यामध्ये मतदान होत आहे. 2014 च्या निकालांचा विचार करता या ठिकाणी एनडीएला 6 जागा मिळाल्या होत्या. भाजपकडून गुरुदासपूरमधून सनी देओल रिंगणात उतरल्याने या ठिकाणची लढत रंगतदार झाली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये या टप्प्यात 13 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. 2014 च्या निवडणुकीचा निकाल पाहता या सर्व जागा एनडीएने जिंकल्या होत्या. या 13 जागांपैकी 12 जागांवर भाजपने विजय मिळवला होता तर एका ठिकाणी एनडीएतील सहकारी पक्ष असलेल्या अपना दलच्या उमेदवाराने विजय मिळवला होता. सपा आणि बसपाच्या आघाडीमुळे यावेळी निवडणुकीत रंगत आली आहे. वाराणसीमधून भाजपसाठी नरेंद्र मोदींचा विजय अगदी सहज होईल. तरी या टप्प्यात इतर जागांवर विजय मिळविण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. बिहारमधील सासाराममध्ये लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार निवडणूक लढवत आहेत. गेल्या वेळी मीरा कुमार यांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला होता. पाटलीपुत्रमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मिसा भारती निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या महाआघाडीकडून रिंगणात उतरल्या आहेत. बिहारचा विचार करता 2014 मध्ये या 8 जागांपैकी एनडीएला 7 जागी विजय मिळाला होता. त्यात भाजपच्या 5 आणि सहकारी पक्ष रालोसपच्या दोन उमेदवारांना विजय मिळवण्यात यश आले होते.
ममता बॅनजीँपुढे जागा राखण्याचे आव्हान
शेवटच्या टप्प्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या पश्चिम बंगालमध्ये 9 जागांसाठी मतदान होत आहे. या सर्व 2014 मध्ये तृणमूल काँग्रेसने जिंकल्या होत्या. भाजपने यावेळी तृणमूलसमोर मोठे आव्हान उभे केले असून या जागा कायम राखण्याचे आव्हान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापुढे आहे.


























































