
सामना ऑनलाईन, मुंबई
पश्चिम रेल्वेवर लांबपल्ल्याच्या गाडय़ांसाठी जोगेश्वरजवळ नवे टर्मिनस तयार करण्याच्या घोषणेशिवाय यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात एकाही नव्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मध्य रेल्वेचा ठाणे ते दिवा रखडलेला पाचवा आणि सहावा मार्ग, पश्चिम रेल्वेचा पाचवा आणि सहावा मार्ग अशा एमयूटीपी योजनेच्या रखडलेल्या प्रकल्पांसाठी यंदा 584 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारही तेवढाच खर्चाचा वाटा उचलणार असल्याने रखडलेल्या एमयूटीपी प्रकल्पांना चालना मिळणार आहे.
मध्य रेल्वेसाठी यंदा 2019-20च्या रेल्वे अर्थसंकल्पात एकूण 7,955 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात कल्याण ते कसारा तिसऱ्या मार्गिकेसाठी 160 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. बेलापूर-सीवूड-उरण रेल्वेमार्गासाठी 154 कोटी रुपये, पनवेल-कळंबोली कोचिंग टर्मिनससाठी 89 कोटी रुपये, सीएसएमटीचे फलाट 24 डब्यांचे करण्यासाठी चार कोटी रुपये आणि लातूर कोच फॅक्टरीसाठी 200 कोटी तर नगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्गासाठी 550 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
जोगेश्वरीत नवे टर्मिनस होणार!
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवरून लांबपल्ल्याच्या गाडय़ांचा भार कमी करून उपनगरीय लोकलच्या फेऱ्यांना बाधा येऊ नये यासाठी जोगेश्वरी स्थानकाजवळ नवे टर्मिनस उभारण्याच्या कामाला रेल्वे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आल्याने त्यास भरीव निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा 10 लाख रुपये मंजूर करण्यात आल्याने येथे काम सुरू करण्यास सुरुवात होणार आहे. येथे डायमंड क्रॉसिंग आणि नवीन क्रॉस ओव्हर तयार करण्याचे काम सुरू होणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी स्पष्ट केले.
कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेला गती!
कल्याण-कसारा ही 67 किलोमीटरची तिसरी मार्गिका तयार करण्याच्या कामाला बजेटमध्ये 160 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या प्रकल्पाचा मूळ खर्च 600 कोटी रुपये असून ही मार्गिका तयार झाल्यास लांबपल्ल्याच्या आणि मालगाडय़ांच्या टॅफिकमधून उपनगरीय लोकलची सुटका होऊन जादा लोकलच्या फेऱ्या चालविणे शक्य होणार आहे.





























































