जिथे चंद्राने केली शिवशंकराची तपस्या.. ‘श्री सोमनाथ’

>> निळकंठ कुलकर्णी

सौराष्ट्रदेशे विशदे तिरम्ये ज्योतिर्मयं चन्द्रकलावतंसम् । भक्तप्रदानाय कृपावतीर्ण तं सोमनाथं शरणं प्रपध्ये ।।
कविरिकानर्मदयो: पवित्रे समागमे सज्जनतारणाय । सदैव मान्धातृपुरे वसन्तमोकारभीशं शिवमेकमीडे ।।

श्री सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक मंदिर आहे. चंद्राने ज्या ठिकाणी शिवाची तपश्चर्या केली. त्याला पूर्वी नाव नव्हते. एकदा ब्रह्मदेव फिरत फिरत सौराष्ट्रात आले. एके ठिकाणी त्यांना जाणवले की, इथे काही वेगळेच पावित्र्य आहे. तेव्हा शोध घेतल्यावर खणल्यानंतर त्या ठिकाणी शिवलिंग सापडले. हिंदुस्थानात जी बारा प्रमुख ज्योतिर्लिंगे आहेत, त्यापैकी सोमनाथ हे सौराष्ट्रातील (गुजरात) आद्य ज्योतिर्लिंग आहे.

प्राचीन काळी या भागात खूप समृद्धी होती. म्हणून याला सुराष्ट्र म्हणतात. त्यानंतर त्याचे रूपांतर सौराष्ट्रात झाले. ऋग्वेद, महाभारत व स्कंदपुराणात याची महती वर्णन केली आहे. अत्री ऋषी व अनसुया यांनी इथे तप केले. श्रीकृष्णाने येथे आपली अवतार समाप्ती केली.

कथा –

सोमनाथ ज्योतिर्लिंग भगवान महादेव यांच्याकडून स्थापित केलेले सर्वात पहिले ज्योतिर्लिंग आहे. भगवान ब्रह्माचा मुलगा प्रजापती दक्ष यांच्या 27 मुलींचा (27 नक्षत्र) विवाह चंद्रदेवा (चंद्रग्रह) बरोबर करण्यात आला. मात्र, एक अटही ठेवण्यात आली की, चंद्रदेव आपल्या सर्व पत्नींना कोणताही फरक न करता एक सारखे प्रेम करेल. परंतु असे करण्यात चंद्रदेव असफल राहिले. त्यामुळे प्रजापती दक्ष यांनी त्यांना शाप दिला की, “हळूहळू त्याची चमक कमी होऊन तो एक मृत ग्रह बनून त्याचा अंत होणार” असा शाप देताना दक्षाने आपल्या मुलीचे पती आणि त्यांच्या भविष्याविषयी काहीच विचार केला नाही. पण, दक्षाची मुलगी म्हणून जन्माला आलेली भगवान शंकराची पत्नी सती हिने भगवान शंकराला चंद्रदेवाचे प्राण वाचवायला सांगितले.

भगवान शंकरानी सतीला आपले यथारूप शिवलिंग देऊन समुद्राच्या किनारी मृतावस्थेमध्ये पडलेल्या चंद्रदेवाजवळ स्थापित करायला सांगितले आणि चंद्रदेवाचे संपूर्ण कुटुंब आणि सप्तर्षी यांच्यासोबत महामृत्युंजय मंत्राचा जप करायला सांगितले. त्यानंतर चंद्रदेव मृतावस्थेमधून बाहेर आले आणि त्यांची लकाकीही परत आली. शंकराने चंद्रदेवाला मृत्यूपासून वाचवण्यासाठी आपल्या डोक्यावर स्थापित होण्यास सांगितले. चंद्रदेवा, माझ्या मस्तकावर स्थापित झाल्या कारणाने तुझा अनंत काळापर्यंत अंत होणार नाही. परंतु दक्षाच्या शापाचा प्रभाव आपल्यावर सदैव राहील. ज्या कारणे तुमची चमक दर 15 दिवसांनी कमी होईल आणि त्यानंतर वाढेल. तसंच तुझ्या दशेचा परिणाम समुद्रदेवावर होणार आणि प्रत्येक 15 दिवस समुद्रामध्ये भरती- आहोटी होणार. यामुळे भगवान शंकर सोम (चंद्राचे) नाथ (स्वामी) बनले आणि सोमनाथ ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली.

महामृत्युंजय मंत्र –

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान मृत्योमुक्षीय मामृतात ।।

ऐतिहासिक माहिती –

या मंदिराचा जीर्णोद्धार अनेक वेळा झाला आहे. याचे कारण म्हणजे हे मंदिर किती वैभवशाली होते ते इथे सापडलेल्या शिलालेखातून दिसून येते. याचा थाट अतिसमृद्ध संस्थानासारखा होता. म्हणूनच हे वैभव शत्रूच्या डोळ्यात सलू लागले आणि मंदिरावर आक्रमण सुरू झाले. गझनीने एकूण अठरा वेळा सोमनाथ स्वाऱ्या करून अमाप संपत्ती लुटली. परंतु शेवटच्या स्वारीत ज्योतिर्लिंगावरच घाव घालून त्या खालील मौल्यवान धातू व कोशागार लुटून गेले. यादवराज वल्लभ, नागभट, भोज परमार, कुमारपाल, महिपाल देव, खेंगे अशा अनेक राजांनी ते मंदिर वेळोवेळी बांधले. 1169 साली बांधलेले कुमारपाल राजांनी बांधलेले मंदिराचे अवशेष 1950 पर्यत मिळत होते.

हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर श्यामलदास गांधी तसेच सरदार वल्लभाई पटेल व के. ऐस मुन्शी यांच्या पुढाकाराने वेरावळपासून 6 कि .मी अंतरावर समुद्रकिनाऱ्यावर हे भव्य मंदिर बांधण्यात आले 11 मे 1951 साली 9 वाजून 46 मिनीटांनी राष्ट्राध्यक्ष राजेंद्रकुमार याच्या हस्ते मोमनाथाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली .

मंत्र –

ॐ नमः श्वभ्य: श्वपतिभ्यश्व वो नमो नमो भवायच रुद्रायच नमः।
शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवायच शितिकण्ठायच ।।

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या