
सोन्याच्या वस्तू ठेवण्यासाठी असलेल्या डबीवरून ओळख पटवून लोकल प्रवासात महिलेचे विसरलेले मंगळसूत्र वर्षभरानंतर मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी परत केले. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
परळच्या गांधी रुग्णालय परिसरात राहणाऱ्या श्रुती मांजरेकर या दोन मुलांसह गेल्या वर्षी नायगाव येथे गेल्या होत्या. नायगाव येथून जलद लोकलने दादरला आल्या. एल्फिन्स्टनला जाण्यासाठी त्या फलाट क्रमांक दोन वर आल्या. त्यानी बॅगेत 35 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ठेवले होते. लोकल आल्यावर त्या घाईगडबडीत बॅग फलाटावर विसरल्या. काही अंतर गेल्यावर बॅग नसल्याचे श्रुती यांच्या लक्षात आले. दरम्यान, तेव्हा गस्तीवर असलेले सहायक उपनिरीक्षक राऊत यांना एका महिलेने बेवारस बॅगेची माहिती दिली.
पोलिसांनी ती बॅग ताब्यात घेतली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. बॅग हरवल्याबाबत तक्रार देण्यासही कोणी पुढे आले नव्हते. त्यामुळे मंगळसूत्र असलेली बॅग मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी मुद्देमाल कक्षात ठेवली होती. वरिष्ठ निरीक्षक प्रदीप धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्देमाल कक्षाचे सहायक उप निरीक्षक नितीन इंगळे, साळवे, शेख यांनी शोध घेण्यास सुरुवात केली.
अन् सोनाराला शोधले
बेवारस मुद्देमाल असल्याने इंगळे यांनी ती डबी उघडली. डबीच्या एका बाजूला छोट्या अक्षरात सोनाराचे नाव होते. हे इंगळे यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी भाईंदर येथील सोनाराला संपर्क केला. गेल्या वर्षभरात कोणी मंगळसूत्र बनवले होते का याची माहिती सोनाराला विचारली. त्याने श्रुती यांची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी श्रुतीला संपर्क साधून ते मंगळसूत्र आणि घड्याळ परत केले.



























































