
धोकादायक ठरल्याने तीन वर्षांपूर्वी तोडलेल्या लोअर परळ पुलाचा महाकाय तब्बल 1040 मेट्रिक टनाचा गर्डर लाँच करण्याचा पराक्रम पश्चिम रेल्वेच्या अभियंत्यांनी केला. या गर्डरचे वजन प्रचंड असल्याने क्रेन चालकांनी उचलण्यास असमर्थता दाखविली होती. त्यामुळे अखेर हा गर्डर चारही मार्गांवर लोकल सेवा चालू असताना पुढे सरकवत यशस्वीपणे बसविण्यात आला. रेल्वेच्या इतिहासात अशा पद्धतीचा सिंगल स्पॅन 90 मीटर लांबीचा 65 डिग्री तिरपा गर्डर बसविण्याचे शिवधनुष्य पश्चिम रेल्वेच्या अभियंत्यांनी सहज पेलले. दुसरा आणि अंतिम गर्डर लवकरच बसविण्यात येणार असल्याने कित्येक वर्षे रखडलेल्या या उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळणार आहे.
सुरक्षा ऑडिटमध्ये धोकादायक ठरल्याने डिलाईल रोड पुलाला फेब्रुवारी 2019 मध्ये तोडण्यात आले होते. त्यामुळे दक्षिण मुंबईत एल्फिन्स्टन रोड पुलाजवळ प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होत आहे. या पुलाचे काम कोरोना संकटामुळे ऑक्सिजन सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्याने रखडले होते. पश्चिम रेल्वेने सिंक्रोनाइज्ड डिस्पलेसमेंट कंट्रोल्ड स्ट्रड जॅक तंत्राचा प्रथमच वापर करीत हा महाकाय गर्डर लाँच केला. गेल्या 18 जूनच्या रात्रीपासून मध्यरात्री साडेतीन तासांचा ब्लॉक घेत 15 इंजिनीयर, 8 पर्यवेक्षक, 102 मजूर यांच्या टीमने डोळय़ात तेल घालून हे काम केले. हा पूल 89.89 मीटर लांबीचा असून 11 मीटरच्या तीन लेन आणि 1.8 मीटरचा फुटपाथ असा हा ब्रिटिशकालीन शंभर वर्षे जुना पूल असून तो 65 डिग्री तिरपा असल्याने हे काम करणे किचकट होते.
हेवी डय़ुटी जॅकचा वापर
हा पूल ओपन वेब गर्डर डिझाईनचा असल्याने त्याला क्रेन लिफ्ट करीत उचलून ट्रकवर बसविणे शक्य नव्हते. प्रथमच हेवी डय़ुटी जॅकचा वापर करून या गर्डरला दर रात्री ब्लॉक घेत काही मीटर सरकवत बसविण्यात आले आहे. दर तासाला दहा मीटर या वेगाने हे काम करण्यात आले. आदल्या रात्री दहा वाजता डय़ुटीला आलेले सर्व कर्मचारी दुसऱया दिवशी पहाटे सहा वाजता मोहीम फत्ते करूनच घरी परतले. आता पालिकेच्या हद्दीतील कामेदेखील समांतर सुरू होणार असून त्यामुळे दुसरा ओपन वेब गर्डर लाँच होताच अंतिम कामाला सुरुवात होणार आहे.





























































