
लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा लुडो गेम चार चौघांमध्ये मोबाईलवर कुठेही खेळता येतो. मात्र हा कौशल्याचा खेळ नसून नशिबाचा खेळ आहे, तर हा खेळ पैसे लावून खेळला जातो. त्यामुळे या मोबाईल अॅपच्या व्यवस्थापनाविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. हायकोर्टाने याचिकेची दखल घेत सरकारला खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
अनेकदा रेल्वे, बस किंवा कामावर फावल्या वेळात लोक लुडो खेळ खेळताना दिसतात. या अॅपवर पैसे लावून गेम खेळण्यात येत असल्यामुळे जुगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा दावा करत केशव मुळे यांनी व्ही.पी. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे त्यांनी दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला. दंडाधिकारी कोर्टाने ‘लुडो’ हा काwशल्याचा खेळ असल्याचे मान्य करत एफआयआर नोंदविण्यास नकार दिला. म्हणून याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात अॅड निखिल मेंगडे यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. चारजण एकत्र येऊन पाच-पाच रुपयांची पैज लावून हा खेळ खेळतात. विजेत्यास 17 रुपये तर अॅप चालकांना त्या मोबदल्यात तीन रुपये मिळतात. लुडोसारख्या खेळाचे रूपांतर जुगारामध्ये होत असून तरुण पिढी याकडे अधिक आकर्षित होत आहे. त्याचा समाजावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच ‘लुडो’चा डाव हा फासा (डाईस) टाकून त्यावर येणाऱया अंकानुसार खेळण्यात येतो. त्यामुळे हा कौशल्याचा खेळ नसून तो निक्वळ नशिबाचा खेळ आहे असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. हायकोर्टाने याची दखल घेत राज्य सरकारला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले व सुनावणी 22 जूनपर्यंत तहकूब केली.

























































