
मुंबई ते अहमदाबाद सुरू होणाऱया देशातील दुसऱया खासगी ‘तेजस एक्प्रेस’च्या प्रवाशांना सुखद धक्का देण्याच्या तयारीत आयआरसीटीसी आहे. या ट्रेनचा प्रवास सुरू होण्याच्या एक दिवस आधीच प्रवाशांचे सामान त्यांच्या मुक्कामी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. रस्तेमार्गे किंवा शक्य झाल्यास हवाईमार्गे प्रवाशांचे सामान त्यांच्या पत्त्यावर पोहचणार आहे. त्यामुळे प्रवाशांची टॅक्सीतून मुंबई सेंट्रल किंवा बोरिवली गाठण्याच्या कटकटीतून सुटका होणार आहे.
दिल्ली ते लखनौनंतर देशातील दुसरी खासगी ‘तेजस एक्प्रेस’ सुरू होण्याच्या आधीच चर्चेत आली आहे. दिल्ली ते लखनौ मार्गावर देशातील पहिली खासगी ‘तेजस एक्प्रेस’ 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली. या ट्रेनमध्ये हवाईसुंदरीच्या धर्तीवर प्रवाशांच्या आदरातिथ्यासाठी ‘रेलसुंदरी’ तैनात करण्यात आल्या आहेत. या ‘तेजस’ एक्प्रेसला उशीर झाल्यास प्रवाशांना ‘रिफंड’ देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याप्रमाणे आयआरसीटीसीने खरोखरच आपल्या वचनाला जागून रेल्वेच्या इतिहासात प्रथमच प्रवाशांना गाडी लेट पोहचल्याने 1.62 लाखाची नुकसानभरपाई दिली होती. 19 ऑक्टोबर रोजी लखनौ-दिल्ली तेजस एक्प्रेस उशिरा पोहचल्याने प्रवाशांना प्रत्येकी 250 रुपयांचा ‘रिफंड’ देण्यात आला होता.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात मुंबई ते अहमदाबाद ही दुसरी खासगी ‘तेजस एक्प्रेस’ धावण्याच्या तयारीत आहे. आयआरसीटीसीने या ट्रेनच्या प्रवाशांचे सामान ट्रेन सुटण्याच्या एक दिवस आधीच जमा करून ते रस्तेमार्गे किंवा हवाईमार्गे म्हणजेच विमानाने त्यांच्या मुक्कामी घरी किंवा हॉटेलात पोहचविण्याची योजना आखली आहे. हे सामान ट्रेन मुक्कामी पोहचण्याआधीच दिलेल्या पत्त्यावर पोहचणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.
लोकलने मुंबई सेंट्रल गाठणे सोपे!
प्रवाशांचे सर्व सामान एक दिवस आधी पोहचविण्याची योजना यशस्वी झाल्यास प्रवाशांना ‘तेजस’ पकडण्यासाठी बोरिवली किंवा मुंबई सेंट्रलला जाण्यासाठी टॅक्सी किंवा ओला-उबर पकडण्याची गरज राहणार नाही. ते लोकल ट्रेननेसुद्धा या ठिकाणी पोहचू शकतील अशी संकल्पना या मागे असल्याची माहिती एका अधिकाऱयाने दिली. प्रवाशांचे सामान वाहून नेण्याचा खर्च म्हणून एका किलोग्रॅमला शंभर रुपये आकारण्यात येणार आहे.





























































