बॅड न्यूज! कोट्यवधी युजर्स असणारे ‘हे’ लोकप्रिय चॅटिंग अॅप 2 दिवसांनी होणार बंद

मेसेज, व्हिडीओ, फोटोंची देवाण-घेवाण करण्यासाठी वापरले जाणारे आणि कोट्यवधी युजर्स असणारे Hike Sticker Chat App बंद होणार आहे. हाईकचे फाऊंडर आणि सीईओ केवीन भारती मित्तल यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. यामुळे हाईक अॅप वापरकर्त्यांना धक्का बसला आहे.

‘येत्या 14 जानेवारीपासून Hike Sticker Chat App हे देशी अॅप हिंदुस्थानमध्ये बंद होणार आहे. युजर्स आपला डेटा आणि बॅकअप चॅट मेल किंवा अन्य ठिकाणी सेव्ह करू शकतात’, असे केवीन भारती मित्तल यांनी म्हटले आहे.

हाईकचे हिंदुस्थानमध्ये 1 कोटींहून अधिक युजर्स असून या अॅपवर प्रत्येक युजर दररोज जवळपास अर्धा तास व्यतित करतो. हाईक अॅप बंद होत असले तरी हाईकचेच Vibe आणि Rush या दोन अॅपचे कार्य पुढेही सुरू राहणार आहे. परंतु हाईक बंद करण्यामागील कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.

hike-1

8 वर्षांचा प्रवास

व्हॉट्सअप आणि अन्य चॅटिंग अॅपला टक्कर देण्यासाठी 2012 ला Hike Sticker Chat App सुरू करण्यात आले. गेल्या 8 वर्षांमध्ये हे अॅप कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचले. मात्र व्हॉट्सअपच्या तुलनेत हे अॅप हवे तेवढे पॉप्यूलर झाले नाही, त्यामुळेच हे अॅप बंद करण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे हिंदुस्थानचे हे एकमेव पॉप्यूलर चॅटिंग अॅप असून हे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने युजर्सला धक्का बसला आहे.

hike2

14 जानेवारीला होणार बंद

Hike Sticker Chat App हे 14 जानेवारीला रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी पूर्णपणे बंद होणार आहे. कंपनीने आपल्या युजर्सला सर्व डाटा इतर ठिकाणी सेव्ह करण्यास सांगितले आहे. तसेच अन्य पर्याय शोधण्यासही सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या