प्रासंगिक : गुरु‘तत्त्व’ आणि ठेवा

>>माधवी सावंत<<

गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरू शिष्याला चंद्राच्या कलांप्रमाणे पूर्णत्वाकडे घेऊन जात असतात व शेवटी गुरू हे आपल्याप्रमाणेच त्याला पूर्णत्व प्रदान करतात. शिष्यामध्ये असणाऱ्या सर्व अवगुणांचा, अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करतात व त्यास पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्णत्व प्रदान करतात याबद्दल गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ पौर्णिमेला गुरुपूजन  केले जाते. गुरूंनी जे ज्ञान, भक्ती व वैराग्य प्रदान केलेले असते म्हणजेच नुसत्या मातीला एक आकार दिला असतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.

शिष्य म्हणून आपली पात्रता झाल्यावर गुरूच आपल्याला शोधत येत असतात. म्हणून गुरू हा करायचा नसतो तर शिष्य म्हणून स्वतःची पात्रता वाढवायची असते. गुरुशिष्य नाते हे अलौकिक असे आहे. सर्व नात्यांपेक्षा या नात्याला फार महत्त्व आहे. कारण हे निरपेक्ष व निःस्वार्थ असे असते. गुरू हे कुठल्याही अपेक्षेने शिष्याला घडवीत नसतात. त्यांना फक्त शिष्याला आत्मानुभूती द्यायची असते, ज्यामुळे तो परिपूर्ण होऊन पुढे गुरूंच्या कार्याचा प्रसार करीत असतो.

गुरू हे एक तत्त्व आहे, जे पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आज असणारी स्थिती व पुढे हाणाऱ्या लयापर्यंत कार्यरत राहणार आहे. गुरू हे सजीव-निर्जीव असे मार्गदर्शक तत्त्व आहे, जे प्रत्येक जीवाला आनंद प्रदान करण्यासाठी प्रेरित करीत असते. सर्वांना एकत्रित करण्याचे कार्य करीत असते. सर्व अवगुणांचा नाश करून गुणातीत करीत असतो. गुरुतत्त्व हे सर्व चराचरात व्यापून उरले आहे. हे तत्त्व अनादी अनंत आहे. ते सर्वांसाठी आहे. त्यात कुठलाच भेदाभेद नाही. ना जात, ना पंथ, ना धर्म, ना स्त्राr-पुरुष. कुठलाच भेद नाही. प्रत्येकाची पारमार्थिक उन्नती होऊन त्याला आनंद मिळावा, जीवनाचे ध्येय साधून ज्या तत्त्वातून निर्मिती झाली आहे त्याच तत्त्वात विलीन हेण्यासाठी  हे तत्त्व गुरू म्हणून मार्गदर्शन करीत असते. म्हणूनच म्हटले जाते, ‘गुरूतत्त्व एक मार्गदर्शक.’

गुरूमध्ये कधीही भेदाभेद करू नये. कारण त्यांचे कार्य एकच असते की, भक्त, साधक याला परमार्थिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करून आनंदाची अनुभूती देणे, काळाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे त्या संतांचे वागणे, बोलणे, क्रियामान कर्म असते. हे वेगवेगळे असले तरी उद्देश मात्र एकच असतो. म्हणून सर्व संत-महात्मे-गुरू हे श्रेष्ठ असतात. नित्य स्मरणीय असतात. कोणीही मोठा किंवा लहान नसतो. ज्याप्रमाणे पाणी तांब्यात भरले किंवा कळशीत भरले किंवा नदीत बघितले तरी एकच असते. ते आकारमानाने लहानमोठे नसते. म्हणून कधीही भेदाभेद करू नका. संतांच्या, गुरूंच्या देहापेक्षा त्याच्या तत्त्वाचे मनन-चिंतन करा व ते स्वतःच्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा.

‘गुरुतत्त्व प्रतिष्ठान’तर्फे दर महिन्याला ‘गुरुतत्त्व’ नावाने मासिक प्रकाशित केले जाते. यात दर महिन्याला एका संताचे चरित्रात्मक लिखाण असते. त्यात चरित्र, त्यांनी केलेली साधना व त्याची शिकवण यावर भर दिला जातो. ज्यामुळे वाचकाला, भक्ताला कळून येते की, ज्याप्रमाणे आपले गुरू मार्गदर्शन करतात त्याचप्रमाणे या संतांनीसुद्धा तेच मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे तत्त्वनिष्ठ होण्यासाठी प्रेरणा मिळते व साधनेत व्यक्ती स्थिर होऊन चराचरामध्ये व्याप्त असलेले आपल्या गुरूचे तत्त्व त्याला दिसायला लागते. त्यामुळे त्याचे दोष दूर होऊन संतांना – गुरूंना अपेक्षित असलेले जीवन जगायला लागतो, ज्यात निरपेक्ष वृत्तीने सेवा घडायला लागते. सेवा हेच एकमेव साधन आहे की, ज्यामुळे गुरूशी या तत्त्वाशी अनुसंधान होऊ शकते. ‘गुरू’ हे कळू शकतात व आपली आध्यात्मिक प्रगती होऊ शकते.