‘लग्नपंचमी’ लवकरच येतेय!मधुगंधा – निपुणची जोडी प्रथमच रंगभूमीवर

मराठी रंगभूमी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक भन्नाट मेजवानी देणार आहे. मराठीतील दोन नावाजलेले, बहुमुखी आणि निखळ संवेदनशील कलावंत मधुगंधा कुलकर्णी आणि निपुण धर्माधिकारी प्रथमच एकत्र येत आहेत. त्यांचं नवीन नाटक ‘लग्नपंचमी’ रंगभूमीवर येण्यापूर्वीच चर्चेत आलं आहे.

मधुगंधा कुलकर्णी यांचं लेखन आणि नाटय़निर्मिती तर निपुण धर्माधिकारी यांचं दिग्दर्शन या दोघांच्या योगदानामुळे नाटक तर टवटवीत होणारच, पण प्रेक्षकांना हसता हसवता विचार करायला लावणार.

मधुगंधा कुलकर्णी हे चोखंदळ रसिकांचं लाडपं नाव. ‘त्या एका वळणावर’ आणि ‘लग्नबंबाळ’ ही नाटपं अजूनही प्रेक्षकांच्या गप्पांमध्ये रंगतात. त्यांनी सात चित्रपटांचं लेखन-निर्मिती करत चार राष्ट्रीय पुरस्कारांची कमान उंचावली. ‘एलिझाबेथ एकादशी’ आणि ‘वाळवी’सारख्या चित्रपटांनी मधुगंधांच्या लेखनाची ताकद सिद्ध केलीच आहे. रंगभूमीकडे परतताना मधुगंधा म्हणतात, “लग्न हा विषय आपला सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा. रंगपंचमीला रंग उधळतात, तसंच लग्नात भावनांची पंचमी असते. त्यामुळे ही लग्नपंचमी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

निपुण धर्माधिकारी म्हणाले, “लग्न’ या विषयावर विनोद न ऐकलेला माणूस दुर्मीळ. स्वत-चं लग्न झालं असेल तर ते विनोद जास्तच समजतात आणि मान डोलावून हसूही येतं! उगाच नाही नाही म्हणत एवढा पुरावा असूनही माणसं लग्न करतात, म्हणजे करतातच! ‘इतरांच्या अनुभवातून शिकावं’ हे शहाणपण लग्नाच्या बाबतीत मात्र नेहमी गायब असतं. ‘लग्नपंचमी’मधल्या पात्रांचंही तेच आहे. ते सुखी संसाराचा साधा मंत्र वारंवार विसरतात. तो मंत्र इतरांनी तरी विसरू नये म्हणून इथे देऊन ठेवतो – ‘शी डज व्हॉट शी वॉण्ट्स… अॅण्ड ही डज व्हॉट शी वॉण्ट्स!’ यापेक्षा लग्नाचं सार सांगणारी दुसरी ओळ नाही.’’