
अशीच आमुची आई असती… एका तळ्यात होती.. रिमझिम झरती श्रावणधारा… यासारखी असंख्य सुरेल गाणी लिहून लाखो मराठी माणसांचे भावविश्व समृद्ध करणारे ज्येष्ठ गीतकार मुधकर जोशी यांचे मंगळवारी खासगी रुग्णालयात किडनीच्या विकाराने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. साध्या सोप्या शब्दांमधून जगण्याचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या या कवीने तब्बल तीन पिढ्यांवर गारूड केले होते. जोशी यांच्या निधनामुळे तरल व मखमली गाण्यांची ‘रिमझिम’ संपली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
संत साहित्याचा गाढा अभ्यास असलेले गीतकार जोशी यांनी अबकारी खात्यात 40 वर्षे नोकरी केली. त्यानंतर पेन्शन हाच त्यांचा आधार होता. गेल्या काही वर्षांपासून ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते. डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवमंदिर स्मशानभूमीत मधुकर जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे जुन्या काळातील लोकप्रिय गीतकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
पाच हजार गाणी हीच ‘श्रीमंती’
गेली 45 वर्षे गीतकार मधुकर जोशी हे आयरे रोडवरील ‘हेरंब’ या इमारतीमध्ये भाड्याने राहात होते. मराठी भाषा तसेच साहित्यावर प्रेम करणाऱ्या या कवीने शेवटपर्यंत हलाखीत जीवन काढले. पण अखेरपर्यंत स्वाभिमान सोडला नाही. पाच हजार गाणी लिहून त्यांनी मराठी साहित्यात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. गजानन वाटवे, माणिक वर्मा, अरुण दाते, सुमन कल्याणपूर, सुधीर फडके, आशा भोसले यांसारख्या नामवंत गायकांनी मधुकर जोशी यांची गाणी गायली आहेत. स्वतः गरिबीत जीवन जगून दुसऱ्याला आपल्या गाण्यांमधून आनंद देणारे मधुकर जोशी हे शेवटपर्यंत उपेक्षित राहिले. अगदी स्वतःचे घरही त्यांना मिळू शकले नाही. मान-सन्मानापासूनही ते काहीसे वंचित राहिले. मात्र पाच हजार गाणी हीच त्यांची खरी ‘श्रीमंती’ होती.
































































