मध्य प्रदेशात 93 आमदारांवर फौजदारी गुन्हे, 186 कोट्यधीश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. सध्या सर्वत्र प्रचाराचा धुरळा उडत आहे. दरम्यान असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यातून त्यांनी नेत्यांवरील फौजदारी गुन्हे, त्यांची संपत्ती व साक्षरतेबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे एकंदरीत मध्य प्रदेशमधील राजकारणात खळबळ उडाली आहे.

या अहवालानुसार मध्य प्रदेशमधील 230 आमदारांपैकी 93 आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे 47 आमदारांवर आहेत. भाजपच्या 129 आमदारांपैकी 39आमदारांवर तर काँग्रेसच्या 97 पैकी 52 आमदारांवर फौजदारी गुन्हे आहेत. सध्याच्या विद्यमान सहा आमदारांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत.

230 पैकी 186 कोट्यधीश

मध्य प्रदेशमध्ये 230 आमदारांपैकी 186 आमदार हे कोट्यधीश आहेत. काँग्रेचे 97 पैकी 76 तर भाजपचे 129 पैकी 107 आमदारांची संपत्ती कोट्यावधीच्या घरात आहेत. संजय शुक्ला हे काँग्रेसचे सर्वात श्रीमंत आमदार असून त्यांची संपत्ती 139 कोटी आहे तर भाजपच्या संजय पाठक यांची एकूण संपत्ती 226 कोटी आहे.