
मध्य प्रदेशमध्ये बस कालव्यात बुडाल्याने झालेल्या अपघातात 34 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या बसमध्ये एकूण 54 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 34 जणांचे मृतदेह हाती लागले असून उर्वरितांचा शोध सुरू आहे.
मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमाराला हा अपघात झाला. मध्य प्रदेशातील सीधी या जिल्ह्यातील रामपूर नैकिन येथे एक प्रवासी बस बाणसागर धरणाच्या कालव्याच्या पुलावरून जात होती. या रस्त्यावरून जाताना बस एका बाजूला वळवण्याच्या प्रयत्नात अनियंत्रित झाली आणि थेट कालव्यात गेली.
कालवा इतका खोल होता की ही संपूर्ण बस त्यात बुडाली. कालव्यात बस बुडत असल्याचं लक्षात आल्यावर त्यातल्या सहा जणांनी बसबाहेर उड्या टाकल्या आणि पोहत किनारा गाठला. पण उर्वरित प्रवाशांसह बस कालव्यात बुडाली.
या अपघाताची माहिती मिळताच बचावयंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. कालव्यापासून जवळच असलेल्या बाणसागर धरणाचं पाणी बंद करण्यात आलं आहे. क्रेनच्या मदतीने बस कालव्यातून बाहेर काढण्यात आली. या दुर्घटनेत आतापर्यंत 34 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
एसडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून बचावकार्य सुरू आहे. कालव्याचा प्रवाह प्रचंड असल्याने काही मृतदेह वाहून गेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




























































