
वैद्यकीय इतिहासामध्ये अत्यंत दुर्मीळ घटना घडली आहे. मध्य प्रदेशमधील हरदा (Harda) येथे गुडघ्यापासून खाली उलटे पाय असणाऱ्या मुलीने जन्म घेतला. हरदा जिल्हा रुग्णालयामध्ये जन्मलेल्या या मुलीच्या पायाचे पंजे मागच्या बाजूला आहे. मुलीच्या जन्मानंतर परिचारिका आणि डॉक्टरही अचंबित झाले असून ही दुर्मीळ घटना असल्याचे त्यांनी म्हटले.
‘दै. भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, हरदा जिल्ह्यातील झांझरी येथे राहणाऱ्या विक्रम याच्या पत्नीने सोमवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता मुलीला जन्म दिला. नॉर्मल डिलिव्हरीनंतर मुलीचे पाय उलटे असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. मुलीच्या डिलिव्हरीनंतर आई-वडिलांनी मात्र तिला एकटे सोडत रुग्णालयातून पळ काढला आहे.
दरम्यान, मुलीच्या जन्मानंतर परिचारिका आणि डॉक्टरही अचंबित झाले. हरदा जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या या मुलीचे वजन कमी आहे. सामान्यत: जन्मावेळी बाळाचे वजन 2.7 किलो ते 3.2 किलो असते, मात्र या मुलीचे वजन फक्त 1.6 किलोग्राम आहे. या मुलीला आई-वडिलांनी सोडल्याने डॉक्टर आणि परिचारिका तिची काळजी घेत असून तिची तब्येत सध्या ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पहिलीच घटना
बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सनी जुनेजा यांनी, माझ्या 5 वर्षाच्या कारकीर्दीमध्ये आतापर्यंत अशी केस पाहिली नसल्याचे म्हटले. या संदर्भात आपण इंदूर आणि भोपाळ येथील बालरोग तज्ज्ञांशी चर्चा केल्याचे ते म्हणाले.
ऑपरेशननंतर पाय सरळ होणार
दरम्यान, इंदूरच्या अरबिंदो रुग्णालयातील हाडांचे डॉक्टर पुष्पवर्धन मंडलेचा यांनी ही दुर्मीळ घटना असल्याचे सांगितले. आईच्या गर्भात कमी जागा असल्याने किंवा अनुवांशिकतेमुळे मुलीचे पाय उलटे झाले असावे असे ते म्हणाले. तसेच आपण आतापर्यंत अशी केस पाहिली नसल्याचे म्हणत, त्यांनी ऑपरेशनंतर मुलीचे पाय सरळ होऊ शकतात, असे सांगितले.




























































