
महाबळेश्वर शहरापासून दोन कि.मी. अंतरावर हॉटेल ‘सुमनराज’जवळ अवैध उत्खनन करणाऱयांवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन जेसीबीसह ट्रक्टर जप्त केला आहे. सोमवारी याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.
केंद्र शासनाने 2001 साली महाबळेश्वर तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे; परंतु तालुक्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर अवैध उत्खनन होत असल्याचे समोर आले आहे. याला काही स्थानिकांचाही पाठिंबा असल्यामुळे या घटना घडत आहेत. परंतु महाबळेश्वरच्या तहसीलदारपदी रुजू झालेल्या तेजस्विनी खोचरे-पाटील यांनी गावकामगार तलाठय़ांना या गोष्टींना आळा घालण्यासाठीच्या सूचना दिल्या होत्या.
तलाठी अविनाश शेडुलकर यांनी तहसीलदार तेजस्विनी खोचरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विनापरवाना उत्खनन करणाऱयांवर कारवाईचा बडगा उगारला. तलाठी शेडुलकर यांनी महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर ‘सुमनराज’ हॉटेलजवळ विनापरवाना उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळावर पोहोचल़े त्या ठिकाणी माहिती मिळाल्याप्रमाणे उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळावर दोन जेसीबींसह एक ट्रक्टरचा वापर सुरू असल्याचे दिसून आले. त्यानुसार तलाठी शेडुलकर यांच्या पथकाने सर्व वाहने जप्त करून तहसील कार्यालयात जमा केली. शनिवार आणि रविवार कार्यालयास सुट्टी असल्याने याप्रकरणी सोमवारी निर्णय घेण्यात येणार आहे. महसूल विभागाने यासंदर्भात महाबळेश्वर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे.


























































