
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्यावर केलेल्या ऐतिहासिक क्रांतीला पुढील वर्षी 20 मार्च रोजी 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या शताब्दी महोत्सवाचा प्रारंभिक समारंभ मुंबई मराठी पत्रकार संघ आणि समान संधी अभियान यांनी संयुक्तरीत्या येत्या 13 मार्च रोजी आयोजित केला आहे. पत्रकार भवनात सायंकाळी 4 ते 9 या वेळेत हा समारंभ पार पडणार आहे.
समारंभाला दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. विवेक कुमार, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, अभिनेते किरण माने, ज्येष्ठ पत्रकार विवेक गिरधारी, मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुंदर राजदीप उपस्थित राहणार आहेत. या वेळी शताब्दीमागील भूमिका आणि नियोजित राज्यव्यापी कार्यक्रम ‘समान संधी अभियान’चे अध्यक्ष सुनील कदम हे मांडणार आहेत. शताब्दी महोत्सवातून मानवी अधिकार आणि लोकशाही मूल्यांचा जागर राज्यभरात करण्यात येणार आहे. तसेच उपेक्षित आणि वंचित समूहांच्या उत्कर्षासाठी कृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.



























































