
महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील महापालिकेच्या वतीने केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या पुलाच्या ‘पायलॉन’चे (भव्य लोखंडी खांब) काम वेगाने सुरू असून, ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
केशवराव खाडये मार्गावर उभारण्यात येणारा हा ‘केबल स्टड पूल’ रेल्वे रुळांवरील महापालिकेचा पहिलाच केबल आधारित पूल आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकानजीक पश्चिम रेल्वेवरून सात रस्ता ते महालक्ष्मी मैदान यांना हा पूल जोडतो. या पुलाची लांबी ८०३ मीटर तर रुंदी १७.२ मीटर आहे. रेल्वे हद्दीतील रुंदी २३.०१ मीटर इतकी आहे.
या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर असून पुलास आधार देण्यासाठी ७८.५ मीटर उंचीचा पायलॉन उभारण्यात आला आहे. पायलॉनच्या पश्चिमेकडील ९५ मीटर लांबीच्या स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. पूर्वेकडील १६५ मीटर लांबीच्या स्पॅनची उभारणी रेल्वे हद्दीत होणार असून, रेल्वेकडून ब्लॉक घेण्यास परवानगी मिळाल्यानंतर हे काम सुरू होईल.
पायलॉनच्या पश्चिम दिशेकडील बहुतांश खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. तथापि, वाहतूक वळविण्याच्या कामामुळे पाच खांबांची उभारणी अद्याप प्रलंबित आहे. वाहतूक पोलिसांच्या परवानगीनंतर ही वाहतूक वळविण्यात येईल. यासाठी महापालिकेतर्फे सर्व्हिस रोड बांधण्यात येत आहे. दरम्यान, उड्डाणपुलाच्या या कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी पाहणी करून आवश्यक ते निर्देश दिले आहेत.






























































