
सामना ऑनलाईन । मुंबई
आदिवासी विभागाच्या दिरंगाईचा भुर्दंड महानंद डेअरीला बसत आहे. आश्रमशाळांमधील मुलांसाठी सुगंधी दुधाची खरेदी करण्यासाठी मागवलेले टेंडर उघडण्यास तांत्रिक कारण देत टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे टेंडरमध्ये सहभागी होण्यासाठी भरलेल्या अनामत रकमेवरील व्याजापोटी डेअरीला महिन्याला सुमारे एक लाख रूपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.
आश्रमशाळांमधील मुलांना पोषण आहारांतर्गत सुगंधी दूध देण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास आयुक्त कार्यालय, नाशिक यांनी 5 नोव्हेंबर रोजी ऑनलाइन टेंडर मागवले होते. इच्छुकांनी टेंडर भरल्यानंतर 1 फेब्रुवारीला उघडण्यात येणार होते. टेंडर भरणाऱ्यादूध संघांनी अनामत रक्कम म्हणून आदिवासी विभागाकडे जमा करणे बंधनकारक होते. तसेच ज्या दूध संघांना टेंडर मिळणार नाही त्यांची अनामत रक्कम 30 दिवसांत परत करण्यात येणार होती. मात्र मुदत संपून दीड महिना उलटला तरी आदिवासी विभागाने टेंडर उघडले नाही.


























































