दुधाचा खरेदी दर वाढल्याने महानंदच्या दूध विक्रीचे गणित बिघडले

शेतकऱयांकडून खरेदी केल्या जाणाऱया दुधाच्या दरात मोठी वाढ झाल्याने महानंद डेअरीच्या दूध विक्रीचे गणित पुरते बिघडले आहे. सध्या दुधाचा खरेदी दर 31 रुपये 70 पैसे असून त्याची वाहतूक, प्रक्रिया, कर्मचारी पगार आणि वितरण असा एकूण 49 रुपयांपेक्षा जादा खर्च प्रतिलिटमागे होत आहे, तर विक्री दर मात्र 44 रुपये आहे. त्यामुळे प्रतिलिटर दुधाच्या विक्रीतून महानंदला नफा नव्हे तर पाच-सहा रुपये एवढा मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

राज्य सरकारने शेतकऱयांकडून खरेदी केल्या जाणाऱया प्रतिलिटर दुधाचा दर 25 रुपये जाहीर केला आहे, मात्र सध्या राज्यात दूध उत्पादनात दहा-बारा टक्के एवढी घट झाली आहे. तसेच दुधाच्या पावडरीला चांगला दर मिळत असल्याने अनेक पावडर उत्पादक मोठय़ा प्रमाणात दुधाची खरेदी करत असल्याने दुधाचा दर 31-32 रुपये लिटर एवढा झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर महानंद डेअरी आपल्या सभासद संघांच्या माध्यमातून शेतकऱयांकडून 31 रुपये 70 पैसे प्रतिलिटर दराने दूध खरेदी करत आहे. तसेच संबंधित संघाला कमिशन आणि वाहतूक खर्चापोटी जवळपास चार रुपये द्यावे लागत आहेत. त्यानंतर दुधावर प्रक्रिया, पॅकिंगवर 10 रुपयांपेक्षा जादा खर्च होत असून त्यापुढे बाजारातील वितरणावर तीन रुपये 65 पैसे एवढा होतो. हा सर्व खर्च 49 रुपयांपेक्षा जादा आहे. त्यामुळे दूध विक्रीचा व्यवसाय करावा की नको असा प्रश्न डेअरीसमोर उभा राहिला आहे.

दरवाढीनंतरही परिस्थिती कायम राहणार
राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांना दुधाच्या विक्री दरात 2 रुपयांची वाढ करून 46 रुपये एवढा केला आहे. त्यानुसार महानंद देअरीनेही आपल्या दरात 25 डिसेंबरपासून दोन रुपयांची वाढ करत 46 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डेअरीला प्रतिलिटर दुधाच्या विक्रीतून दोन रुपये जादा मिळणार असले तरी त्यामुळे परिस्थितीमध्ये फारसा फरक पडणार नसल्याचे दिसत आहे.

दिवसाला दहा लाखांचा घाटा
महानंद डेअरी दररोज सुमारे दोन लाख लिटर दुधाचे वितरण करते. मात्र सध्या प्रतिलिटर दुधाच्या विक्रीतून पाच-सहा रुपये तोटा होत आहे. त्यानुसार दररोजच्या दूध विक्रीचा विचार करत महानंदला सध्या दिवसाला दहा लाख रुपये एवढा तोटा सहन करावा लागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या