
महानंद डेअरीमधील दूध वितरकांच्या कमिशनचा वाद तुर्तास टळला आहे. कोरोना महामारीच्या काळात डेअरीने सुरू केलेले एक रुपया वाढीव कमिशन व्यवस्थापणाने अचानक बंद केल्याने वितरकांनी दुधाचे वितरण थांबवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे टरकलेल्या व्यवस्थापणाने पुढील दहा दिवसांत वितरकांच्या कमिशनबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने सध्या दुधाचे सुरळीत वितरण सुरू आहे.
महानंद डेअरीने कोरोना महामारीच्या काळात घसरलेली दुधाची विक्री वाढावी म्हणून प्रति लिटर दुधमागे मुख्य वितरकांना 50 पैसे तर उपवितरकाना 50 पैसे असे एक रुपया कमिशन सुरू केले होते. मात्र 19 ऑगस्टपासून डेअरीने वितरकांना कोणतीही सूचना न देता कमिशन बंद केले आहे. त्यामुळे वितरकांमध्ये नाराजी असून त्यांनी दुधाचे वितरण न करण्याचा इशारा दिला होता. डेअरीने त्याची दखल घेतली आहे. डेअरीचे राज्य सरकारकडे सुमारे 28 कोटी रुपये थकीत आहेत. पुढील दहा दिवसांत थकीत रक्कम सरकारकडून मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे लवकरच वितरकांच्या कमिशनबाबत ठोस निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले.


























































