
उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच्या आजच्या पहिल्या रविवारी महाराष्ट्रात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह मुंबई आणि महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीच्या उमेदवारांनी आज रविवारच्या सुट्टीचा अचूक मुहूर्त साधत जोरदार प्रचार केला. हजारो कार्यकर्ते आणि नागरिक या प्रचारात सहभागी झाले होते.
वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या भव्य प्रचारफेऱया आज काढण्यात आल्या. धनुष्यबाणाचे चिन्ह असलेल्या भगव्या टोप्या घालून, खांद्यावर भगवी उपरणी आणि हातात भगवे ध्वज घेऊन हजारो शिवसैनिक, भाजपा आणि रिपाइंचे नेते व कार्यकर्ते तसेच नागरिक या फेऱयांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे वरळीचा परिसर भगवामय झाला होता. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा जोरदार घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दुमदुमून सोडला.
आदित्य ठाकरे यांची प्रचारफेरी सकाळी 9 वाजता वरळीच्या वीर जिजामाता नगर येथून सुरू झाली. तेथून सूर्यदर्शन, पंचशील, टेनामेंट सोसायटय़ांमधून डॉ. ऍनी बेझंट रोडवरील विविध चाळींमधून मरिअम्मा नगर, व्ही. पी. नगर, मार्कंडेश्वर नगर, पुजारी नगर मार्गाने ही फेरी डेअरी क्वॉर्टर्स येथे समाप्त झाली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता प्रचारफेरीला शिवसेना शाखा क्रमांक 195 पासून पुन्हा सुरुवात झाली. देवरूखकर मार्ग, भोसले मार्ग, बनसोडे मार्ग, भागाजी वाघमारे मार्ग, विक्रीकर मार्ग अशा मार्गानी शंकरराव नरम पथमार्गे गणपतराव कदम मार्गावरून ही प्रचारफेरी कोकण वैभव, नागावकर मार्ग, वडाची चाळ येथून कामगार नगरात प्रचारफेरीची सांगता झाली. ऑक्टोबर हीट असतानाही प्रचारफेऱयांमध्ये कार्यकर्त्यांचा चांगला भरणा होता. आज सुट्टीचा पुरेपूर उपयोग उमेदवारांनी केला. शिवसेनेचे मुंबादेवी मतदारसंघातील उमेदवार पांडुरंग सकपाळ, शिवडीतील अजय चौधरी, कालिनातील संजय पोतनीस, दिंडोशीतील सुनील प्रभू, नालासोपारा येथील प्रदीप शर्मा आदींच्या प्रचारफेऱयांना सकाळी लवकरच प्रारंभ झाला. त्यानंतर दुपारी थोडी विश्रांती घेऊन उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर पुन्हा सायंकाळी चार वाजता प्रचारफेऱ्या काढल्या गेल्या.
सुट्टी असल्याने नातेवाईक आणि मित्रमंडळी असे सर्वच आज उमेदवारांच्या प्रचारासाठी धावून आले होते. सकाळपासून रस्त्यारस्त्यांवर पदयात्रा आणि प्रचारफेऱया निघाल्या होत्या. प्रचारफेरी येताच सोसायटय़ांमधील पदाधिकारी आणि नागरिकांकडून उमेदवारांचे स्वागत केले जात होते. शाळांना सुट्टी असल्याने लहान मुले आणि महिलाही मोठय़ा संख्येने प्रचारात सहभागी झाल्याचे चित्र होते.
मुस्लिम बांधवांचा ‘शिवसेना झिंदाबाद’चा नारा
आदित्य ठाकरे यांच्या प्रचारफेरीत मुस्लिम बांधव आणि महिलाही उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. जिजामाता नगर येथे त्यांची प्रचारफेरी पोहचली तेव्हा मुस्लिम बांधवांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. मुस्लिम महिलांनीही यावेळी ‘शिवसेना झिंदाबाद’चे नारे दिले.
आरे वृक्षतोडीचा विरोध करणाऱ्या आंदोलकांनाही दिलासा
आरेच्या जंगलात मेट्रो कारशेडसाठी सरकारने केलेल्या झाडांच्या कत्तलीचा निषेध करण्यासाठी डीवायएफआयच्या वतीने वरळी जिजामाता नगर येथे आंदोलन केले गेले. वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची सुटका करण्याची मागणी या आंदोलकांनी केली. आदित्य ठाकरे यांनी प्रचारफेरीदरम्यान या आंदोलकांचीही भेट घेतली आणि सर्व कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आजच चर्चा करू असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलकांना दिलासा मिळाला.





























































