
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिटीकेला जोर चढला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आम्ही नटरंगासारखे काम केले नाही. आम्हाला हातवारे करता येत नाहीत. उत्तर आम्हालाही देता येईल, पण आम्ही देणार नाही असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पवार यांना टोला लगावला.
आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, मात्र समोर कोणी विरोधकच नाही अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची खिल्ली उडवली होती. त्यावर बार्शीमध्ये झालेल्या निवडणूक प्रचारसभेत शरद पवार यांनी लढाई पैलवानांमध्ये होते इतरांशी नाही अशा शब्दांत आणि हातवारे करीत मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. पण जळगावमधील नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आम्ही नटरंगासारखे काम केले नाही. आम्हाला हातवारे करता येत नाहीत. उत्तर आम्हालाही देता येईल, पण आम्ही देणार नाही अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पलटवार केला.






















































