खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्राची पदक अष्टमी, सागरी जलतरणात उपविजेतेपद

खेलो इंडिया बीच स्‍पर्धेत महाराष्ट्राने 3 रौप्य, 5 कांस्यपदकांसह 8 पदकांची लयलटू केली आहे. साताऱ्याच्‍या दीक्षा यादव पदकाचा डबल धमाका केला. दीक्षाच्‍या १ रौप्‍य व १ कांस्य पदकामुळे सागरी जलतरणात महाराष्टाने उपविजेतेपद पटकावले.

दीवमधील अरबी समुद्रातील सागरी जलतरणाचा महाराष्ट्राच्‍या मुलींनी पदकाचा करिश्मा घडविला. साताऱ्याच्‍या दीक्षा यादवे ५ किमी शर्यतीत रौप्‍य तर १० किमी शर्यतीत कांस्य पदक पटकावले. सलग दुसऱ्या वर्षी दीक्षाने दोन्‍ही शर्यतीत पदकाचा पराक्रम केला आहे. या यशामुळे सागरी जलतरणातील महिलांचे उपविजेतपद महाराष्ट्राने संपादन केले. कर्नाटकला विजेतेपदाची तर महाराष्ट्राला उपविजेतेपदाचा करंडक पथकप्रमुख नवनाथ फरताडे यांच्‍या हस्‍ते देण्यात आला.

दीवमधील घोघला समुद्र किनाऱ्यावर दुसर्‍या खेलो इंडिया बीच स्‍पर्धेचा थरार रंगला. सागरी जलतरणाच्या जोरावर कर्नाटकाने सर्वसाधारण विजेतेपदाचा मान पटकविला. तामिळनाडूने स्‍पर्धेत दुसरे तर मणिपूरने तिसरे स्थान संपादन केले. या तिन्‍ही संघानी प्रत्‍येकी 3 सुवर्ण, 2 रौप्य पदके जिंकल्‍याने सर्वसाधारण विजेतेपदाचा फैसला कांस्य पदकावर घेण्यात आला. 3 सुवर्ण, 2 रौप्य व 6 कांस्यपदकाची लयलूट करीत कर्नाटकाने स्‍पर्धेत बाजी मारली.

स्‍पर्धेत महाराष्ट्राचे ७७ जणांचे पथक सहभागी झाले होते. यामध्ये ३१ पुरूष व २८ महिला खेळाडूंचा समावेश होता. स्‍पर्धेत बीच सॉकर, बीच कबड्डी, बीच पेंचक सिलट, सागरी जलतरण महाराष्ट्राच्‍या खेळाडूंनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. महाराष्ट्राने 3 रौप्य, 5 कांस्यपदकांसह 8 पदकांची कमाई केली आहे. बीच पेंचक सिलट स्‍पर्धेत २ रौप्‍य व १ कांस्य पदके महाराष्ट्राच्‍या नावापुढे झळकली. बीच कबड्डी दोन्‍ही संघाना तर बीच सॉकरमध्ये पुरूष संघाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

सर्व पदकविजेत्‍यांचे क्रीडा आयुक्‍त शीतल तेली-उगले, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी, उपसंचालक संजय सबनीस यांनी अभिनदंन केले आहे. सर्व पदकविजेत्‍यांचे कौतुक करीत सहसंचालक सुधीर मोरे यांनी सांगितले की खेलो इंडिया बीच स्पर्धा ही खेळाडूंसाठी मोठी पर्वणी ठरली. स्‍पर्धेच्‍या दुसऱ्या पर्वातही महाराष्ट्राची चमकदार कामगिरी केली आहे.