महामुंबई सुस्साSSट! पनवेल ते विरार नवा कॉरिडॉर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-local-001
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईबाहेर पसरलेल्या महामुंबईमध्ये रेल्वेचे जाळे विणण्याचा मार्ग एकदाचा मोकळा झाला आहे. एमएमआर क्षेत्रात वाहतुकीचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या सुमारे 54,000 कोटींच्या एमयूटीपी-3(अ) या महत्त्वाकांक्षी योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पनवेल ते विरार नवा उपनगरीय कॉरिडॉर, सीएसएमटी ते पनवेल फास्ट एलिव्हेटेड कॉरिडॉर, बोरिवली ते विरार पाचवी आणि सहावी मार्गिका अशा योजनांना त्यामुळे चालना मिळणार आहे. यापूर्वी राज्य सरकारने एमयूटीपी-3लाही मंजुरी दिली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वतीने शहरी वाहतूक प्रकल्प-3(अ)ची अंमलबजावणी होत आहे. हा प्रकल्प राज्य आणि रेल्वेच्या सहभागातून मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुन्हा हा प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्ड आणि नीती आयोगाकडे जाणार आहे.

गोरेगाव ते बोरिवली हार्बर
गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत हार्बरचा विस्तार झाल्याने बोरिवली येथे राहणाऱ्या चाकरमान्यांना सीएसएमटीला थेट येणे सोपे होणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या सध्याच्या वांद्रे ते बोरिवली मार्गावरील गर्दीचा भार कमी होण्यास सहाय्य होणार आहे.

पनवेल ते विरार नवा उपनगरीय कॉरिडॉर
पनवेल ते विरार या नव्या उपनगरीय कॉरिडॉरमुळे डहाणू ते कर्जतपर्यंतच्या एमएमआर क्षेत्रातील पूर्व ते पश्चिम उपनगरांना जोडता येणार आहे. सध्या विरार ते पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास होतो. उत्तर दिशेने जेएनपीटीसाठी जाणाऱ्या वाहनांची येथे कोंडी होत असते. ती विरार-वसई-पनवेल मार्गाने दूर होईल. या मार्गावर 11 नव्या स्थानकांसह एकूण 24 स्थानके होणार आहेत.

सीएसएमटी ते पनवेल कॉरिडॉर
या एलिव्हेटेड फास्ट कॉरिडॉरने मुंबई ते पनवेल अंतर पन्नास मिनिटांत गाठता येणार आहे. 55 कि.मी.च्या या उन्नत मार्गावर 11 स्थानके असणार असून नवी मुंबई विमानतळाला जोडणारा मार्ग अखेर मेट्रोने जुन्या विमानतळाशीही जोडला जाणार आहे.