
इंधन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर सरकारी कामकाज अधिकाधिक ऑनलाईन होईल यावर राज्य शासनाने भर दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. त्यामुळे आजच्या बैठकीत केवळ एकच निर्णय होऊ शकला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऑनलाईन बैठकीत ऑमिटी विद्यापीठाच्या विस्तारासाठी रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला रायगडच्या पनवेल तालुक्यातील भाताण येथील 15 एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही.
रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेतर्फे ऑमिटी विद्यापीठांतर्गत 18 शाखांमधून विविध शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यात प्री-नर्सरीपासून उच्च शिक्षणापर्यंत आणि त्यानंतर संशोधनापर्यंतचा समावेश आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण प्रदान केले जाते. आपल्या शैक्षणिक कार्याचा विस्तार करण्यासाठी या संस्थेने सरकारकडे भूखंडाची मागणी केली होती. या जमिनीचा वापर शैक्षणिक संकुल तसेच खेळाची मैदाने, वसतिगृहे, ग्रंथालय, प्रयोगशाळा अशा शैक्षणिक कारणासाठीही केला जाणार आहे.

























































