गॅस सिलिंडर, ऑटो रिक्षा, सीसीटीव्ही कॅमेरा, सूर्यफूल; अपक्षांना मिळाली चिन्हे

अपक्ष म्हणून महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या वतीने आज चिन्हांचे वाटप करण्यात आले. या उमेदवारांपुढे एकूण १९४ निवडणूक चिन्हांचा पर्याय ठेवण्यात आला होता. त्यापैकी बहुतेक उमेदवारांनी गॅस सिलिंडर, ऑटो रिक्षा, सूर्यफूल, सीसीटीव्ही कॅमेरा या चिन्हांना विशेष पसंती दिली. चिन्ह वाटप झाल्यामुळे उद्यापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.

महापालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने तीन चिन्हांचे पर्याय उमेदवारी अर्जात दिले होते. ही सर्व चिन्हे त्यांना १९४ चिन्हांच्या यादीतून निवडायची होती. उमेदवाराने प्रथम निवडलेले चिन्ह जर दुसऱ्या उमेदवाराने यापूर्वीच घेतले असेल अशा उमेदवारांना त्यांनी मागणी केलेले दुसऱ्या क्रमांकाचे चिन्ह देण्यात आले. या चिन्हांमध्ये उमेदवारांनी सर्वाधिक पसंती नेहमीच वापरात असलेल्या वस्तूंना दिली. बहुतेक उमेदवारांनी गॅस सिलिंडर, ऑटो रिक्षा, पेनाची नीब, सूर्यफूल, बॅग, सुटकेस आदी चिन्हांना पसंती दिल्याने त्यांना निवडणुकीसाठी हीच चिन्हे देण्यात आली आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी संपली. त्यानंतर निवडणूक आयोगाने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करून आज अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले. चिन्ह वाटप करण्याचा कार्यक्रम सर्वच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पार पडला. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनाही निवडणूक चिन्हे मिळाल्यामुळे उद्यापासून प्रचाराचा खऱ्या अर्थाने धूमधडाका सुरू होणार आहे.

आमच्या भविष्यासाठी मतदान करा!

मतदानाचा अधिकार बजावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करावे. आमचे भविष्य घडवण्यासाठी येत्या १५ जानेवारी रोजी आपला अधिकार बजावावा, असे पत्र नवी मुंबईतील दोन हजार विद्यार्थ्यांनी आपले पालक आणि नातेवाईकांसह नवी मुंबईकरांना पाठवले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे शहरात सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक यंदा चार आणि तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत होत आहे. मतदान करताना मतदारांचा गोंधळ उडू नये यासाठी महापालिका प्रशासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या अनुषंगाने मतदार जनजागृतीच्या स्वीप उपक्रमांतर्गत शाळांमध्येही अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. पालकांना व नातेवाईकांना आवाहन करणारा पत्रलेखन हा अभिनव उपक्रम नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक ३६ व १२२ कोपरखैरणे गाव या ठिकाणी राबविण्यात आला.