दिसला माणूस की पकड अन् टाक पट्टा गळ्यात; भाजपच्या कारभाराची वसई-विरारकरांनी उडवली खिल्ली

ऑपरेशन लोटसमधील बनवाबनवी जनतेच्या निदर्शनास आल्यानंतर भाजपने वसई-विरारमध्ये आता मिशन प्रवेश सुरू केले आहे. दिसला माणूस की पकड, टाक प्रवेशाचा पट्टा गळ्यात आणि कर सोशल मीडियावर फोटो व्हायरल, असा धडाका उठवला आहे. भक्तांनी सुरू केलेल्या या कारभाराचा वसई-विरारकरांनी अक्षरशः खिल्ली उडवली आहे. कामानिमित्त भाजपच्या कार्यालयात गेलेल्या एका बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याचा भाजपवाल्यांनी प्रवेश करून घेतला. मात्र नंतर या पदाधिकाऱ्याने पुन्हा बविआमध्ये घरवापसी केली.

नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी शुक्रवारी रात्री समाजमाध्यमांवर पोस्ट टाकत बविआचे कार्यकर्ते विजय तिवारी यांनी पक्षप्रवेश केल्याचे स्पष्ट केले. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या याच विजय तिवारींनी स्वतःच्या समाजमाध्यमांवरील खात्यांवर बहुजन विकास आघाडी पक्षाचा शेला गळ्यात घालून आपण बहुजन विकास आघाडीचेच कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट केले. मी माझ्या एका सहकाऱ्यासह भाजप कार्यालयात काही कामानिमित्त गेलो होतो, पण तिथे गेल्यावर माझ्या गळ्यात भाजपचा पट्टा घालून मी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी जाहीर केले, पण मी बहुजन विकास आघाडीचाच कार्यकर्ता आहे. शहरात घडलेले हे पक्षांतराचे प्रकरण आणि त्यानंतर तिवारी यांनी दिलेले स्पष्टीकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.