महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची नवी टीम जाहीर, अमरजीतसिंग मनहास कोषाध्यक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची नवी टिम काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठाrनी जाहीर केली असून कोषाध्यक्षपदी अमरजितसिंह मनहास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची नवीन टीमच्या नावाच्या यादीला मंजुरी दिली आहे. या टीममध्ये अठरा उपाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

पृथ्वीराज चव्हाण शिस्तपालन समितीचे प्रमुख
माजी मुख्यमंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची शिस्तपालन समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यशैलीबद्दल सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱया काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या यादीत पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश होता. यूपीए सरकारच्या काळात केंद्रात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सध्या कोणतेही महत्त्वाचे पद सोपवण्यात आले नव्हते. पण आता थेट शिस्तपालन समितीचे अध्यक्षपद सोपवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या समितीमध्ये उल्हास पवार, भालचंद्र मुणगेकर, मुझफ्फर हुसेन, हर्षवर्धन सपकाळ यांचीही वर्णी लावण्यात आली आहे.

तृतीयपंथीयांना स्थान
प्रदेश कार्यकारिणीत प्रथमच दोन तृतीयपंथीयांना स्थान देण्यात आले आहे. सलमा खान साकेरेकर व पार्वती जोगी यांची काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांना स्थान देऊन सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना संधी देऊन काँग्रेसने सर्वसमावेशकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी नव्या टीमच्या नावाची घोषणा केली आहे.