
कोरोना चाचण्या आणि लसीकरण मोठय़ा प्रमाणात सुरू असूनही कोरोना रुग्णांचा दररोजचा आकडा मात्र अपेक्षेपेक्षा कमी होत नसल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली असून आज दिवसभरात 9 हजार 336 रुग्ण सापडले तर 3 हजार 378 जण कोरोनामुक्त झाले.
राज्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान कोरोनाची दररोजची रुग्णसंख्या 70 हजारापर्यंत तर सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाखांपर्यंत पोहोचली होती. मात्र कठोर निर्बंध, कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर दिलेला भर यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आली. तरीही सध्या रुग्ण 8 हजार ते साडेनऊ हजारच्या आजपास सापडत आहेत. राज्यात आज दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱयांच्या तुलनेत नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा सक्वालाखाच्या जवळ पोहोचली आहे.
रुग्णसंख्येत चढउतार
राज्यांत जूनपासून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या मोठी होती. मात्र, आज कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या कमी आली असून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात आज दिवसभरात 123 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत एक ते दीड हजाराने सातत्याने चढउतार होत आहे. दरम्यान, राज्यांत आतापर्यंत एकूण 58 लाख 48 हजार 693 जण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95. 91 टक्के इतके आहे तर मृत्यूदर 2.01 टक्के आहे.





























































