
शिवसेनेने मुंबापुरीचा कायापालट केला आहे. पालिका शाळांतील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले आहेत. आरोग्य यंत्रणा सक्षम आहे, परिवहन सेवा ‘बेस्ट’ आहे, उत्तम स्वच्छता राखली जाते. हेच विकासाचे रोल मॉडेल आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवायचे आहे. त्यासाठी मला तुमची खंबीर साथ आणि अनमोल मत हवे, असे आवाहन मंगळवारी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
कुर्ल्यातील महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारासाठी आज आदित्य ठाकरे यांची नेहरूनगर येथे दणदणीत सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. पालिकेच्या 1232 शाळांमध्ये सव्वा तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी पाचशे शाळा व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून जोडल्या आहेत. त्यानुसार उर्वरित शाळांबरोबरच राज्यातील सर्वच शाळांमध्ये ही व्यवस्था करायची असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना चित्रपट सेनेचे दिगंबर नाईक, शिवसेना विभाग संघटक संजना मुणगेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुषम सावंत, रिपाइंचे विवेक पवार आदी उपस्थित होते.
कुर्ल्याचा आवाज बुलंद करणारा लोकप्रतिनिधी
महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर हे मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर शिवसेनेच्या गटप्रमुखापासून ते आमदारापर्यंत पोहचले आहेत. तीच चिकाटी आजही त्यांच्यात आहे. आमदार म्हणून ते कुर्लावासीयांच्या समस्या नेहमी सभागृहात मांडतात. त्या सोडवण्यासाठी धडपडत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
दिलेला शब्द शिवसेनेने पाळला – कुडाळकर
म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास, शासकीय जमिनीवरील इमारतींचा पुनर्विकास, स्वदेशी मिलच्या कामगारांची थकलेली देणी मिळवून देण्याचा शब्द पाच वर्षांपूर्वी शिवसेनेने दिला होता. तो शिवसेनेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून मी पाळला आहे. त्यामुळेच आज येथील रहिवाशांबरोबरच गिरणी कामगार समाधान व्यक्त करत असल्याचे मंगेश कुडाळकर यांनी स्पष्ट केले. तसेच यापुढेही कुर्ल्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.




























































