सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे!

2157

महाराष्ट्रात लोकशाहीच्या उत्सवाचे आज दिवाळीच्या जल्लोषात रुपांतर झाले. शिवसेना-भाजपा-रिपाई महायुतीच्या बाजूने राज्यातील मतदारांनी पुन्हा एकदा कौल दिला. 288 पैकी तब्बल 161 जागांचे दान महायुतीच्या पदरात टाकले. गेल्या निवडणुकीत सुपडा साफ झालेल्या विरोधकांना शरद पवार यांच्या अथक परिश्रमाने ‘पॉवर’ दिली. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागा जिंकल्या. पवारांच्या ‘पॉवर’मुळे काँग्रेसलाही संजीवनी मिळाली. काँग्रेसला 45 जागा मिळवता आल्या. या निवडणुकीत अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वरळी विधानसभा मतदारसंघाकडे लागले होते. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तिथे पदार्पणातच 70 हजारांजवळ विक्रमी मताधिक्य मिळवून भगवा फडकवला. भाजपने सर्वाधिक 102 जागा जिंकल्या असल्या तरी सत्तेच्या चाव्या 57 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेच्याच हाती आल्या आहेत. आता संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे लागले आहे.

नव्या विधानसभेत 23 महिला आमदार
नव्या विधानसभेत 23 महिला आमदार असतील असे चित्र असून त्यात 11 विद्यमान आमदारांचा समावेश आहे. मावळत्या विधानसभेत 22 महिला आमदार होत्या. त्यात यावेळी एका आमदाराची भर पडली आहे.
प्रथमच विधानसभेत निवडून जाणाऱ्या महिला आमदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे (देवळाली), शिवसेनेच्या लता सोनावणे (चोपडा) आणि यामिनी जाधव (भायखळा), भाजपच्या मुक्ता टिळक (कसबा पेठ), श्वेता महाले (चिखली), मेघना बोर्डीकर (जिंतूर), नमिता मुंदडा (केज), काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (वरोरा) व सुलभा खोडके (अमरावती) यांचा समावेश आहे. गीता जैन (मीरा-भाईंदर) आणि मंजुळा गावीत (साक्री) या दोन अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजयी झाल्या आहेत.

सत्तेचा उन्माद जनतेने उतरवला!
सत्तेचा उन्माद जनतेने उतरवला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे, सत्तेचा गैरवापर आणि वाट्टेल ते बोलणे हे जनतेला पटलेले नाही. म्हणूनच ‘220 के पार’ असा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरला आहे, असेही ते म्हणाले.
‘ईडी’चा वापर करून आमचा आवाज दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही, असेही पवार म्हणाले.
शिवसेनेसोबत जाण्याचा आमचा बिलकूल विचार नाही, काँग्रेस आमचा मित्रपत्र आहे. काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांना एकत्र घेऊन आम्ही काम करणार आहोत, असे पवार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या