‘निसर्ग’चा तडाखा सोसूनही ताठ मानेने उभ्या राहिल्या अलिबागमधील वाड्या-वस्त्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाड–पोलादपूरमधील दरड दुर्घटनेत 94 जणांचे बळी गेले. अनेकजण बेघर झाले. या घटनेने बरोबर वर्षभरापूर्वी झालेल्या एका मोठय़ा आपत्तीच्या आठवणी जाग्या झाल्या. ती आपत्ती होती ‘निसर्ग’ महाचक्रीवादळाची. रायगडवर कोसळलेल्या या आपत्तीने महाड-पोलादपूरसह अलिबाग तालुक्याला अक्षरशः होत्याचे नव्हते केले. लाखो घरे कोसळली, बागायती नष्ट झाल्या, पण रायगडकर हरले नाहीत. सरकारच्या मदतीने आणि स्वतःच्या हिमतीने ते पुन्हा उभे राहिले. घरसंसार सावरून नारळ, सुपारी, आंब्याच्या बागा पुन्हा फुलवत आहेत. अलिबाग तालुक्यातील चौल, थळ, नागाव, रेवदंडा या गावातील वाडय़ा-वस्त्यांमधील गावकऱयांनी आपत्तीवर मात करून पुन्हा जगण्याचा सारीपाट मांडला आहे.

3 जून 2020 रोजी कोकण किनारपट्टीला ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यात अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यात अक्षरशः होत्याचे नव्हते झाले. अलिबाग तालुक्यातील थळ, चौल, नागाव, रेवदंडा या गावातील वडिलोपार्जित बागायती मुळासकट उखडून पडल्या. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या भागाला भेट देऊन ग्रामस्थांची विचारपूस केली आणि दोन दिवसांतच सरकारी मदत पाठवली. या वादळग्रस्तांच्या नुकसानभरपाईसाठी घरे व बागायतीचे जुने निकष बदलून सरकारने भरीव मदत केली. आपणच परस्परांना आधार दिला पाहिजे या जाणिवेतून एकमेकांच्या मदतीला गावकरी धावून गेले. सगळ्यांनी प्रत्येक वाडीत श्रमदान केले. वाडय़ा स्वच्छ झाल्या. रस्त्यावर कोसळलेले विजेचे पोल पुन्हा उभे राहिले. त्यामुळे अंधारात लोटलेल्या घरांमध्ये पुन्हा प्रकाश पसरला.

झाडे दहा वर्षांनी फळे देतील तोवर वाट पाहूच

नारळ-पोफळीच्या वर्षानुवर्षे उत्पन्न देणाऱया बागा कोसळून गेल्या. पण इथल्या गावकऱयांनी पडलेली झाडे कापून पुन्हा लागवड केली. कृषी विभागाने नारळ-सुपाऱयांची रोपे दिली. ती आपल्या वाडय़ांमध्ये रुजवली. या झाडांचे उत्पन्न येण्यास अजून दहा ते बारा वर्षे लागतील, पण आम्ही वाट पाहू. आमच्यासह आमच्या पुढच्या पिढय़ांना याचा लाभ होईल, असा विश्वास चौल येथील बागायतदार प्रणय घरत यांनी व्यक्त केला.

सरकारी मदत घराघरात पोहचली

राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांसाठी रायगडमध्ये 448 कोटींचा निधी दिला. त्यापैकी 348 कोटी 73 लाख 84 हजार रुपये नुकसानग्रस्तांच्या घराघरात पोहचले. बागायतीची नुकसानभरपाई म्हणून सुरुवातीला हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर झाली. पण नंतर प्रत्येक झाडामागे मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याचा फायदा आपग्रस्त रायगडकरांना झाला. – सचिन शेजाळ, तहसीलदार, अलिबाग