भाजपला रोखण्यासाठी बिहारमध्ये महाराष्ट्र फॉर्म्युला, लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार एकत्र येणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी बिहारमध्येदेखील ‘महाराष्ट्र फॉर्म्युला’ अमलात आणावा. राष्ट्रीय जनता दल, जनता दल (संयुक्त) व अन्य राजकीय पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका आरजेडीचे रघुवंश प्रसाद सिंह यांनी मांडली आहे. लालूप्रसाद यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार भाजपविरोधात एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन किमान समान कार्यक्रमावर सरकार स्थापन केले. त्याप्रमाणे बिहारमध्ये भाजपविरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तर एनडीएचा निश्चित पराभव होईल. बिहारमध्ये महाराष्ट्र फॉर्म्युला वापरल्यास भाजपविरोधातील राजकीय पक्षांना निश्चितच फायदा होईल, असे आरजेडी नेता रघुवंश प्रसाद म्हणाले.

बिहारच्या राजकारणात कधीही काही होईल
बिहारच्या राजकारणात लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांनी एकत्र यावे यासाठी रघुवंश प्रसाद हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. एनडीएसोबत असलेले नितीशकुमार कधीही भाजपची साथ सोडू शकतात. यापूर्वी त्यांनी अनेकदा तशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते कधी काय करतील आणि बिहारच्या राजकारणात कधीही काही होईल हे सांगता येत नाही, असे रघुवंश प्रसाद यांनी सांगितले.