सरकारी रुग्णालयांतील 480 डॉक्टरांचे आज ‘काम बंद’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्षानुवर्षे रुग्णसेवेसाठी स्थायी पदांवर कार्यरत असलेल्या 480 डॉक्टरांना कायम करण्यात येत नसल्याने या वैद्यकीय अधिकाऱयांनी 11 जानेवारी रोजी एक दिवसाचे ‘काम बंद’ आंदोलन करणार आहेत. मात्र कोरोना काळात या डॉक्टरांची सेवा अत्यावश्यक असल्याने आंदोलन केल्यास सेवा खंडित करण्याचा इशारा या वैद्यकीय अधिकाऱयांना रुग्णालय प्रशासनाने दिला आहे.

राज्यभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील 570 स्थायी पदांवर सुमारे 480 डॉक्टर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. रुग्णसेवेसाठी ही पदे आवश्यक असूनही यावर मागील 13 ते 14 वर्षांत एमकेसीएलमार्फत पदभरती करण्यात आली नाही. उलट एमबीबीएस झालेल्या या डॉक्टरांकडून गेली कित्येक वर्षे या स्थायी पदांवर रुग्णसेवा, प्रशासकीय तसेच न्यायालयीन प्रकरणांची जबाबदारी अशी कामे करून घेतली जात आहेत. या कामांचा अनुभव येऊनही कायम करण्याची या डॉक्टरांची मागणीही पूर्ण केली जात नाही. गेल्या 10 वर्षांपासून कायम करण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करूनही आश्वासनापलीकडे हाती काहीच लागत नसल्याने या वैद्यकीय महाविद्यालयांतील वैद्यकीय अधिकारी 11 जानेवारी रोजी ‘कामबंद’ आंदोलन करणार आहेत.