
राज्यसभेत बहुमत नसल्याने बऱयाचदा सरकारला एखादा कायदा किंवा धोरण आखताना तारेवरची कसरत करावी लागते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र व हरयाणातील भाजपच्या जागांमध्ये घट झाली आहे. यामुळे राज्यसभेच गणित बिघडणार असून 2020 मध्येही एनडीएला राज्यसभेत बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे.
लोकसभेत बहुमत असले तरी राज्यसभेत भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. यापूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने केलेल्या खराब कामगिरीमुळे एनडीएला राज्यसभेत बहुमताचा आकडा गाठणे शक्य नाही. 2020 मध्ये होणाऱया राज्यसभेच्या निवडणुकांचा विचार करता महाराष्ट्र व हरयाणातून भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडून येणे गरजेचे होते, पण दोन राज्यांत भाजपला चांगली कामगिरी करता आली नाही. उलट असणाऱया जागांत घट झाली. याचा परिणाम राज्यसभेतील भाजपच्या पर्यायाने एनडीएच्या संख्याबळावर होणार आहे.
महाराष्ट्र व हरयाणात राज्यसभेच्या 24 जागा
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 19 जागांपैकी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे 7 जागा आहेत. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या 11 जागा आहेत. हरयाणातील राज्यसभेच्या पाच जागांपैकी काँग्रेसकडे फक्त एक जागा असून भाजपकडे तीन जागा आहेत, तर राज्यसभेचे पाचवे खासदार सुभाषचंद्र हे अपक्ष असून त्यांना भाजपचा पाठिंबा आहे.
2020 मध्ये राज्यातून फक्त चार जागा भाजप-शिवसेनेला
महाराष्ट्रातून राज्यसभेवर 7 जागा 2020 मध्ये निवडून द्यायच्या आहेत. विधानसभेतील भाजप-शिवसेनेचे संख्याबळ पाहता सात जागांपैकी चार जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. हरयाणातील दोन जागा रिक्त होत असून त्यापैकी एक जागा निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ भाजपकडे नाही.























































