
युरोप, चीन व कोरिया मध्ये कोरोनाचा विळखा अद्याप वाढत असल्याने आपल्याला काळजी घ्यावीच लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेले बरेच जुजबी निर्बंध आता मागे घेण्या संदर्भात सरकार प्रयत्नशील आहे. मात्र मास्क मुक्तीचा विचार अद्याप केला नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले कि लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठीच रेल्वे, बस व मॉल मधील दोन डोसचा निर्णय अजून कायम ठेवलेला आहे. यावेळी लहान मुलांच्या लसीकरणाबाबत ते म्हणाले की, 18 वर्षांखालील 91 टक्के मुलांचा लसीचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. तर 74 टक्के मुलांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. 15 ते 18 वयोगटातील 62 टक्के मुलांचा पहिला डोस व 40 टक्के मुलांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. 12 ते 15 वयोगटातील 26 टक्के मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
शाळा कॉलेज सुरु झाल्यामुळे आता लहान मुलांचे लसीकरणाचे प्रमाण वाढेल अशी आशा आहे. राज्यात आम्हाला 100 टक्के लसीकरणाचा टप्पा गाठायचा आहे. त्यामुळे कोणीही लसीकरणाला दिरंगाई करू नये, असे आवाहन यावेळी टोपे यांनी केले.
टास्क फोर्सच्या सुचने नुसारच राज्य सरकार निर्णय घेतात. त्यामुळे मुख्यमंत्री व टास्क फोर्स यांनी केलेल्या सूचने नंतरच राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले. येत्या 2 तारखेला येणारा गुढीपाडवा आहे तर 14 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. सण साजरे करा मात्र ते शिस्तबद्ध रितीने साजरे केले जावेत असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.
इतर देशामध्ये पसरत असलेली कोरोनाची चौथी लाट लक्षात घेता मास्क मुक्तीचे धाडस आपण करू शकत नाही. त्यामुळे अद्याप मास्कबाबत निर्बंध हटविण्यात आले नाहीत. जेव्हा परिस्थिती आटोक्यात येईल त्यावेळेस मुख्यमंत्री मास्क मुक्तीची घोषणा करतील असे टोपे यांनी सांगितले. जगात व देशात काय परिस्थिती आहे या बद्दल टास्क फोर्स वेळोवेळी राज्य सरकारला मार्गदर्शन करत असते. टास्क फोर्स सोबत दर आठवड्याला राज्य सरकारची बैठक होते. त्यामुळे सध्या लसीकरण पूर्ण करण्यावर जोर देण्यात येईल असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.





























































