
>> राजेश चुरी
निसर्ग चक्रीवादळ, क्यार चक्रीवादळ, विदर्भातील पूर आणि कोरोनाच्या संकटाचा महाराष्ट्र सामना करीत असताना आता परतीच्या पावसाचा राज्याला मोठा फटका बसला आहे. परतीच्या पावसामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील तब्बल दहा लाख हेक्टरवरील उस, कापूस, सोयाबीन, कांदा, मका, भात, उडीद, तूर, केळीच्या बागा, डाळिंबाच्या बागा आणि भाजीपाल्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पावसाने आतापर्यंत साठ जणांचा बळी घेतला आहे.
यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण होते. पण 14 ऑक्टोबरला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडय़ासह इतर काही भागांत अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली. या पुराचा फटका बसलेल्या बारामती, सोलापूर, पंढरपूर व धाराशीवमधील परांडा येथे एनडीआरएफच्या चार टीम पाठवून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. आठ हजार कुटुंबातील चाळीस हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले. तरीही या तडाख्यात 60जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्वाधिक मृतांची संख्या सोलापूरमध्ये आहे. या जिह्यात लहान-मोठय़ा 800 जनावरांचा मृत्यू झाला.
मदत व पुनर्वसन विभाग तत्पर
या वर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसला तेव्हा राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने कोकणाला 629 कोटी रुपयांची मदत केली. विदर्भात पूर आला तेव्हा भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूरमध्ये 179 कोटी रुपयांची मदत केली. विविध इमारत दुर्घटना झाल्या तेव्हा मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत आणि आता कोरोना संकटात या विभागाने आतापर्यंत 693 कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली.
- राज्यात आजअखेरपर्यंत झालेला पाऊस – 1 हजार 117 मि.मी.
- सरासरी पाऊस – 111 टक्के.
- 21 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


























































