
महाराष्ट्र हे महिलांना आदर सन्मान देऊन नेतृत्वाला संधी देणारे राज्य आहे. येथील महिलांच्या रक्तात आणि आत्म्यातच नेतृत्वगुण भिनला आहे. राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, मृणाल गोरे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या सर्व महिला महाराष्ट्राची शान आणि अभिमान आहेत, असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी मंगळवारी लोकसभेतील कार्यक्रमात केले.
लोकसभेत नवनिर्वाचित विधिमंडळ सदस्यांसाठी आयोजित विशेष प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्राइड संस्था आणि लोकसभा सचिवालय यांच्यातर्फे हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांच्यासह महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणाला महाराष्ट्रातून 100हून अधिक विधिमंडळ सदस्यांनी हजेरी लावली आहे. विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत, महेंद्र काज आदी उपस्थित होते.




























































