
>> आशीष बनसोडे
राज्यातील जवळपास सर्वच कारागृहे कैद्यांनी हाऊसफुल झाली आहेत. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे काही कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले; मात्र तरीदेखील उरलेली कैद्यांची संख्या मोठी आहे. असे असताना राज्यातील हजारो कैद्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केवळ 119 जणांचा वैद्यकीय स्टाफ काम करीत असल्याचे गंभीर चित्र आहे.
राज्यातील कारागृहे क्षमतेपेक्षा तिपटीने भरलेली आहेत. कैद्यांमध्ये अनेकांना वेगवेगळय़ा व्याधी असतात. शिवाय अचानक आरोग्य बिघडल्यास त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यासाठी कारागृहांमध्ये वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपलब्ध असणे गरजेचे असते.
कारागृह विभागाच्या वैद्यकीय ब्रँचच्या आकडेवारीनुसार राज्यातील कारागृहांसाठी सद्यस्थितीत 175 वैद्यकीय स्टाफची मंजुरी आहे. त्यात मानसशास्त्रज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी क्लास-1, वैद्यकीय अधिकारी 2 व 3, कंपाऊंडर, नर्सिंग ऑर्डर्ली आणि लॅब टेक्निशियन यांचा समावेश आहे. 175 जागांपैकी 119 जागा भरण्यात आलेल्या असून 56 वैद्यकीय जागा रिक्त आहेत.
हजारो कैद्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केवळ 119 वैद्यकीय स्टाफ अशी दयनीय अवस्था कारागृह आरोग्य ब्रँचची आहे. परिणामी उपलब्ध स्टाफवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो असे कारागृह विभागाने स्पष्ट केले.
मंजूर जागा भरलेल्या जागा रिक्त जागा
मानसशास्त्रज्ञ 5 1 4
मानसोपचारतज्ज्ञ 3 1 2
वैद्यकीय अधिकारी
क्लास 1 व 2 22 14 8
वैद्यकीय अधिकारी
क्लास 3 22 18 4
कंपाऊंडर 47 36 14
नर्सिंग ऑर्डली 67 47 20
लॅब टेक्निशियन 9 5 4
एकूण 175 119 56

























































