
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा सांगितल्याने आणि त्यानंतर कन्नड रक्षक वेदिकेच्या गुंडांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केल्याने वातावरण तापले आहे. एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सातत्याने चिथावणीखोर विधाने करून महाराष्ट्राला डिवचत असताना दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र या प्रकरणावर मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे विरोधकांनी संताप व्यक्त केला असून आता हा मुद्दा दिल्लीच्या दरबारी पोहोचला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राबाबत करीत असलेली चिथावणीखोर वक्तव्ये व त्यानंतर सीमाभागातील मराठी जनतेवर सुरु झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची महाविकास आघाडीच्या खासदारांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान खासदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची शहा यांच्याकडे तक्रार केली.
अमित शहा यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकून घेतले. ही बैठक अतिशय सकारात्मक झाली असून त्यांनी लवकरात लवकर परस्पर समन्वयाने तोडगा काढू अशा आश्वासन दिले आहे. तसेच अमित शहा यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत एकत्र चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. 14 डिसेंबर रोजी एकत्र चर्चा होईल अशीही माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
View this post on Instagram
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येणे गरजेचे होते. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नसल्याचे शिवसेना खासदार राजन विचारे म्हणाले. आम्ही बोलत असताना सभागृहात माईक बंद करण्याचे काम सुरु असल्याचेही विचारे म्हणाले.





























































