
सोलापूरचा प्रशांत जगताप (86 किलो) आणि कोल्हापूर शहराचा नितीन पवार (70 किलो) या मल्लांनी 63 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत रविवारी सकाळच्या सत्रात सुवर्णपदकांची कमाई केली. प्रशांतने पदार्पणातच सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर नितीनने पाचव्या प्रयत्नांत हे सोनेरी यश संपादन केले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही मानाची कुस्ती स्पर्धा सुरू आहे. सकाळच्या सत्रात 70 व 86 किलो वजनी गटातील माती विभागातील अंतिम फेरीचे सामने पार पडले. यात 86 किलोच्या माती विभागात सोलापूरच्या प्रशांत जगतापने नगरच्या आकाश भिंगारेला 8-2 गुणांनी पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. 22 व्या वर्षी प्रथमच ‘महाराष्ट्र केसरी’ वजनी गट स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रशांतने पदार्पणातच सुवर्णपदकावर आपली मोहर उमटवली. सोलापूर जिह्यातील कुंभारगाव येथील हा पैलवान वस्ताद अमृत भोसले यांच्या तालमीत तयार झाला आहे. पुण्याच्या संतोष पडळकरने सांगलीच्या रणजीत पवारला 10-0 ने हरवत कास्यपदकाला गवसणी घातली.
- 70 किलोच्या माती विभागातील अंतिम लढतीत कोल्हापूर शहरचा नितीन पवार व कोल्हापूर जिह्यातील मच्छिंद्र निवंगरे यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची झाली. दोघांनीही 4-4 गुण मिळविले, मात्र नियमांनुसार निर्धारित वेळेतील अंतिम गुण हा नितीन पवारने पटकावल्याने त्याला विजेता घोषित करण्यात आले व तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. नितीन पवारने यापूर्वी 2017 सालच्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत कास्यपदक पटकावले होते. ‘महाराष्ट्र केसरी’ वजनी गटातील ही त्याची पाचवी स्पर्धा असून वस्ताद कृष्णात पाटील यांचा तो पठ्ठय़ा होय. सोलापूर जिह्यातील संतोष गावडेने धाराशीवच्या लक्ष्मण जाधवला 2-1 च्या फरकाने हरवत कास्यपदकला गवसणी घातली.





























































