
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे बिगुल वाजले आहे. या स्पर्धेचा पहिला दिवस आशिष तोडकर, सुरज अस्वले, स्वप्नील शेलार, प्रतिक जगताप, ओंकार भोईर या मल्लांनी गाजवला असून, स्पर्धेची दणक्यात सुरूवात केली. स्पर्धेच्या उद्घाटनाची कुस्ती माती विभागातील 86 किलो वजनी गटात जालना जिह्याच्या अभिषेक परीवले व पिंपरी चिंचवडच्या शेखर लोखंडे यांच्यात झाली. अभिषेकने 14-4 अशा गुणांच्या फरकाने लोखंडेवर एकतर्फी विजय मिळवला.
बीडच्या आशिष तोडकर, कोल्हापूरच्या सुरज अस्वले, पुणे जिह्याच्या स्वप्नील शेलार यांनी 57 किलो गटातून तर, पुणे जिह्याच्या प्रतिक जगताप, कल्याणच्या ओंकार भोईर, जळगावच्या ऋषिकेश वैरागी यांनी 86 किलो वजनी गटातून आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना स्पर्धेत विजयी सलामी दिली. 86 किलो वजनी गटात जालना जिह्याच्या अभिषेक परीवलने पिंपरी-चिंचवडच्या शेखर लोखंडेला 14-4 असे पराभूत केले. कोल्हापूरच्या ऋषिकेश पाटीलने गिरीधर डुबेला 4-0 असे पराभूत केले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आजी-माजी कुस्तीगिरांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, कुस्तीगिरांना आरोग्य सुविधा, सन्मानजनक मानधन, निवृत्तीवेतन व अन्य सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले. तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंच्या मानधनात भरघोस वाढ करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करेल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.



























































