महाराष्ट्रात मराठी यायलाच हवे! राज्यपाल कोश्यारी यांच्या कानपिचक्या

1449

इंग्रजी भाषेचा वापर करायला हरकत नाही, मात्र स्थानिक भाषांचा वापर होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. महाराष्ट्रात मराठी यायलाच हवी, अशी स्पष्ट भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मांडली. मराठी भाषेवरून सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी राज्यपालांनी कानपिचक्या दिल्या.

गुरुवारी २३ व्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल कोश्यारी यांनी मराठीवरून टोला लगावला होता. शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १५वा दीक्षांत

समारंभ राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांनी पुन्हा मराठी भाषेचा अग्रही मुद्दा मांडला. या दीक्षांत समारंभात कोणीही मराठीत भाषण केले नाही. यावर राज्यपाल कोश्यारी म्हणाले, मराठीचा अभिमान बाळगा, महाराष्ट्रात मराठी यायलाच हवी.

पश्चिम बंगालमध्ये गेल्यानंतर एक-दोन वाक्ये जरी बंगाली भाषेत बोलले तरी बंगाली लोक खूश होतात. मी जरी उत्तराखंडमधून आलो असलो तरी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्रात आल्यानंतर मराठी यायलाच हवी, असे राज्यपाल म्हणाले. विद्यार्थांच्या आयुष्यात पदवी स्वीकारण्याचा क्षण खूप आनंददायी असतो, मात्र पदवी घेणे म्हणजे शिक्षणाचा अंत नाही. यापुढे मोठ्या जोमाने देशाच्या प्रगतीसाठी विद्याथ्र्यांनी काम करावे असे राज्यपालांनी सांगितले. दरम्यान, या दीक्षांत समारंभात ११,४२७ विद्याथ्र्यांना पदवी प्रदान करण्यात आली तर ५४ विद्याथ्र्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.

मला मराठी बोलता येत नसल्याची खंत

मातृभाषेचा अभिमान असावा अन् प्रत्येकाने मातृभाषेचा सन्मान करावा. मी महाराष्ट्राचा राज्यपाल झालो हे माझे भाग्य असून मला मराठी भाषा समजते, मात्र बोलता येत नसल्याची खंत आहे. प्रत्येकाला संस्कृत, हिंदी, इंग्रजी, बंगाली, मराठी यासह अन्य भाषाही यायला हव्यात, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

  • भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडचे आहेत. मात्र ज्यावेळेस त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारली तेव्हापासून त्यांनी मराठी भाषा शिकण्याचा सातत्याने प्रयत्न केला. विधिमंडळाचे अभिभाषणही राज्यपालांनी मराठीतच केले.
आपली प्रतिक्रिया द्या