नगरपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मंगळवारी होणार मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणाऱया 106 नगरपंचायतींच्या निवडणुका मंगळवार, 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी गेल्या काही दिवसांत उडालेला प्रचाराचा धुरळा आज खाली बसला. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून मंगळवारी उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेणे निवडणूक आयोगाला क्रमप्राप्त ठरले. त्यानुसार 27 टक्के जागा वगळता उर्वरित जागांवर 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली होती. राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्त पदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार आहे.