कोरोना रुग्ण आणि मृत्युसंख्येबाबत सरकार कोणतीही आकडेवारी लपवत नाही, आरोग्य विभागाची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण, मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण यंत्रणा पारदर्शकपणे काम करत असून कोणतीही आकडेवारी लपविण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील यापूर्वीच अतिशय पारदर्शकपणे कोरोना रुग्णसंख्येची माहिती अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आज देण्यात आली.

केवळ तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा माहिती प्रलंबित राहते. तथापि ती अद्ययावत करण्यासाठी जिल्हा आणि महानगरपालिकेकडे नियमित पाठपुरावा केला जातो असेही आरोग्य विभागाने नमूद केले आहे. रुग्ण व मृत्यू यांच्या नोंदी करण्याची प्रक्रिया लक्षात घेतल्यास त्यामधील विविध टप्पे आणि त्यामध्ये येणाऱया अडचणी समजून येतात. रुग्ण अथवा मृत्यूची नोंद घेऊ नका, अशी कोणतीही सूचना दिली जात नसल्याचेही आरोग्य विभागाने म्हटले आहे

रिअल टाइम डेटा मिळवण्यात अडचणी

याबाबतीमधील प्रलंबित माहिती व त्यातीत तफावतीतील प्रमुख कारणांची माहिती आयोग्य विभागाने दिली आहे. प्रत्येक हॉस्पिटलने त्यांच्याकडील रुग्णांची माहिती वेळेवर भरावी, अद्ययावत करावी यासाठी प्रत्येक रुग्णालयाला ‘फॅसिलिटी अॅप’ ही ऑनलाइन सेवा पुरवण्यात आलेली आहे. तथापि अनेक रुग्णालये, विशेषतŠ खासगी रुग्णालये या ‘फॅसिलिटी अॅप’वर त्यांच्याकडील रुग्णांची माहिती अद्ययावत करत नाहीत. त्यामुळे किती रुग्ण बरे होऊन घरी गेले अथवा किती जणांचा मृत्यू झाला याबाबत रियल टाइम डेटा मिळण्यामध्ये अडचणी येतात असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.