
शत्रूशी लढण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवली जातील, दर्जेदार प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली. विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी जगात जे काही सर्वोत्तम आहे ते सर्व महाराष्ट्र पोलीस दलाला देण्यास सरकार वचनबद्ध आहे, असेही ते म्हणाले.
अंधेरीतील मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र पोलिसांचा ‘रेझिंग डे’ साजरा झाला. या दिनानिमित्त पोलिसांचे संचलन पार पडले. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलीस दल अधिक सक्षम बनवण्यावर सरकारचा भर असल्याचे सांगितले. जग पुढे चाललेय. आपल्या पोलीस दलापुढे मोठी आव्हाने आहेत. आपल्यासमोरील शत्रूकडे शस्त्रास्त्रे आहेत, त्याने लढण्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे. त्याच्याशी लढण्यासाठी जगात जे जे काही सर्वोत्तम आहे ते ते महाराष्ट्र पोलीस दलाला पुरवले जाईल, असे ते म्हणाले. आपले पोलीस दल शत्रूपेक्षा एक पाऊल पुढे असले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱया पोलिसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. डय़ुटीवर असताना पोलीस कामाचा ताण किती आहे हे बघत नाहीत. सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात ते स्वतŠला झोकून देतात. प्रशिक्षण,शस्त्रास्त्रे व इतर सुविधांशिवाय पोलिसांकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट असावी लागते ती म्हणजे धाडस. हे धाडस महाराष्ट्र पोलिसांकडे आहे हे मी अभिमानाने सांगू शकतो, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रात ‘रेझिंग डे’निमित्त संचलन पार पडले. दरवर्षी नायगाव येथे हा दिन साजरा केला जातो.
घरांचाही प्रश्न सोडवणार
पोलिसांना चांगल्या दर्जाची घरे तसेच इतर मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पोलिसांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मरोळ परिसरातील इमारतीचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) बिपिन बिहारी तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.





























































