
झारखंड, दिल्लीमध्ये ‘ऑपरेशन लोटस’चा प्रयत्न फसल्यानंतर भाजप अर्थात कमळाबाईची वाईट नजर आता कॉँग्रेसवर पडली आहे. पक्षांतर्गत नाराजीचा फायदा घेत महाराष्ट्रात कॉँग्रेसमध्ये फूट पाडण्याची ‘हात’घाई भाजपकडून सुरू आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भेटीमुळे कॉँग्रेसमध्ये लवकरच फूट पडणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेसचा एक बडा नेता भाजपच्या संपर्कात असून येत्या काही दिवसांत हा नेता आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे काही आमदार आणि माजी मंत्रीही भाजपच्या संपका&त असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यादरम्यान अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांना भेटल्याची माहिती उघड झाली आहे. भाजप नेते आशीष कुलकर्णी यांच्या निवासस्थानी या दोघांमध्ये 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कोणे एकेकाळचे निकटवर्ती राहिलेले आशीष कुलकर्णी सध्या भाजपमध्ये आहेत. मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे गणपती दर्शनाच्या निमित्ताने जरी चव्हाण आणि फडणवीस यांची भेट झाली असली तरी राजकीय वर्तुळात मात्र तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.
फडणवीस यांचे हात वर
भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांनी माझी कुठलीही भेट घेतलेली नाही. एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी मी पोहचलो आणि तेही पोहचले. ते दर्शन घेऊन निघाले तेवढय़ात मी पोहचलो. असं तर सगळय़ांचं होतं, मात्र माझी आणि त्यांची कुठलीही भेट झालेली नाही, असे सांगत फडणवीस यांनी हात वर केले आहेत.
चव्हाणांकडून साफ इन्कार
भाजपचे पदाधिकारी असलेल्या आशीष कुलकर्णी यांच्या घरी गणपतीच्या निमित्ताने फडणवीस यांची भेट झाली. या भेटीमध्ये आमच्यात विविध विषयांवर गप्पा झाल्या, पण कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे कॉँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. दिल्लीत परवा काँग्रेसचा मोर्चा असून त्यासाठी आपण उद्या दिल्लीला जात असल्याचे ते म्हणाले.
7 आमदार फुटणार?
फडणवीस आणि चव्हाण यांच्या भेटीमुळे काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अशोक चव्हाणच नव्हे तर काँग्रेसचे एकूण सात आमदार हे भाजपच्या संपका&त आहेत. हे सर्वजण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. बऱयाच काळापासून हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले जाते. यात चार माजी मंत्र्यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे सात आमदार कोण याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अशोक चव्हाण यांच्याबाबत जाणीवपूर्वक संभ्रम, काँग्रेसचे स्पष्टीकरण
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यासंदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारे आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहेत. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात कॉँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. मात्र गेल्या काही दिवसांत चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भाने चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.





























































